
मक्केतील मशिदीत अनैतिक कृत्य; सौदीने दोन बांगलादेशी नागरिकांना फासावर चढविले; पूर्वसूचना न दिल्याने बांगलादेश दूतावास आक्रमक!
: सौदी अरेबियातील पवित्र शहर मक्का येथील एका मशिदीमध्ये धार्मिक पावित्र्याचा आणि मर्यादांचा कथित भंग केल्याच्या आरोपाखाली दोन बांगलादेशी नागरिकांना मृत्युदंडाची शिक्षा सुनावण्यात आली असून त्यांना फाशी देण्यात आली आहे.
सौदीच्या गृह मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, नजरुल इस्लाम अब्दुल बसीर आणि सिटी अख्तर अशी या दोषींची नावे असून त्यांना १४ ऑक्टोबर रोजी मक्का भागात फाशी देण्यात आली.
दरम्यान, या फाशीची कोणतीही पूर्वकल्पना जेद्दाह किंवा ढाका येथील बांगलादेशी दूतावासाला देण्यात आली नव्हती. त्यामुळे बांगलादेशच्या परराष्ट्र मंत्रालयाने यावर नाराजी व्यक्त करत सौदी सरकारकडे अधिकृत राजनैतिक पत्राद्वारे स्पष्टीकरण मागवले आहे.
नेमके प्रकरण काय?
‘ताजीर’ अंतर्गत सुनावली फाशी सौदी प्रेस एजन्सी आणि स्थानिक वृत्तपत्र ‘अजेल’च्या वृत्तानुसार, मक्का भागातील मशिदीत दोघांनी गंभीर अमर्यादित आणि अनैतिक कृत्य केल्याचा आरोप होता. सुरक्षा यंत्रणांनी त्यांना ताब्यात घेऊन प्राथमिक चौकशीनंतर न्यायालयात हजर केले. गुन्ह्याचे गांभीर्य आणि पवित्र स्थळाचे उल्लंघन लक्षात घेऊन न्यायालयाने इस्लामिक कायद्यातील ‘ताजीर’ या विशिष्ट गुन्ह्यांसाठी न्यायाधीशांच्या अधिकारातील कठोर शिक्षा अंतर्गत दोघांना मृत्युदंडाची शिक्षा ठोठावली.
शाही आदेशानंतर फाशी वरिष्ठ अपीलीय न्यायालये आणि सर्वोच्च न्यायालयाने हा निकाल कायम ठेवल्यानंतर, अंतिम शाही आदेश जारी करून दोघांना फाशी देण्यात आली. मात्र, त्या दोघांनी नेमके कोणते अनैतिक कृत्य केले होते, याचा तपशील सौदी प्रशासनाने सार्वजनिक केलेला नाही.
सौदी सरकारचा कडक इशारा या कारवाईनंतर सौदी अरेबियाच्या गृह मंत्रालयाने कडक इशारा जारी केला आहे. देशातील शांतता, सुव्यवस्था आणि न्याय राखण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे. पवित्र मशिदींच्या पावित्र्याशी छेडछाड करणाऱ्या किंवा धार्मिक मर्यादांचा भंग करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीवर, मग तो कोणत्याही देशाचा नागरिक असो, इस्लामिक कायद्यानुसार अशीच कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल.
बांगलादेश दूतावासाची भूमिका जेद्दाह येथील बांगलादेशी दूतावासाच्या अधिकाऱ्यांनी ‘द डेली स्टार’ला माहिती दिली की, “या शिक्षेच्या अंमलबजावणीबाबत सौदी प्रशासनाकडून आम्हाला आधी कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आली नव्हती. आम्ही सौदी अरेबियाच्या परराष्ट्र मंत्रालयाला औपचारिक कूटनीतिक पत्र पाठवून या प्रकरणाचा संपूर्ण तपशील मागवला आहे.”
मृत्युदंडाच्या मुद्द्यावरून आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चा : सौदी अरेबियामध्ये दिल्या जाणाऱ्या कठोर मृत्युदंडाच्या शिक्षेवरून मानवाधिकार संघटना सातत्याने प्रश्न उपस्थित करत आहेत. या फाशीच्या केवळ एक दिवस आधी सौदीच्या सर्वोच्च न्यायालयाने श्रीलंकेच्या शिवरासा एनोजन या हिंदू नागरिकाची फाशीची शिक्षा रद्द केली होती. एनोजन यांच्यावर फेसबुकवरील एका कमेंटवरून ईशनिंदेचा आरोप झाला होता, परंतु श्रीलंका सरकारच्या सातत्यपूर्ण राजनैतिक प्रयत्नांनंतर त्यांची शिक्षा रद्द करण्यात यश आले होते.




