सिव्हिल’ मधील समस्या तातडीने दूर करा ठाकरे शिवसेना; सीटी स्कॅन मशिनसह पार्किंगचे प्रश्न सोडवा


जिल्हा शासकीय रुग्णालयातील सर्वसामान्य रुग्णांना भेडसावणाऱ्या गैरसोयी तातडीने दूर करण्याच्या मागणीसाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना आक्रमक झाली आहे. बंद असलेले सीटी स्कॅन मशिन, अपघात विभागातील गैरसोयी, सुरक्षारक्षकांची कमतरता आणि विस्कळीत पार्किंगसह विविध प्रश्नांवर शिवसेनेच्या शिष्टमंडळाने अधिष्ठाता डॉ. रामानंद यांची भेट घेऊन प्रशासनाला जाब विचारला. समस्या तातडीने मार्गी न लागल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला.
शिवसेनेचे तालुका समन्वयक शेखर घोसाळे, तालुकाप्रमुख मयूर पाटील, महिला उपजिल्हाप्रमुख रशिदा गोडिल, शहरप्रमुख प्रशांत साळुंखे, महिला शहरप्रमुख सेजल बोराटे, उपशहरप्रमुख नितीन तळेकर व सलील डाफळे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने अधिष्ठातांची भेट घेतली. या वेळी रुग्णालयातील विविध समस्यांवर चर्चा करण्यात आली.
गेल्या अनेक दिवसांपासून बंद असलेले सीटी स्कॅन मशिन तातडीने सुरू करावे, अपघात विभागातील रुग्णांशी उर्मटपणे बोलणाऱ्या नवख्या डॉक्टरांवर नियंत्रण ठेवावे आणि सुरक्षारक्षकांची कमतरता दूर करावी, अशी मागणी करण्यात आली. औषध वितरण केंद्रावर स्पष्ट फलक, नवीन ठिकाणी हलविण्यात आलेल्या अपघात विभागासाठी दिशादर्शक फलक आणि पार्किंग व्यवस्था सुरळीत करण्याची मागणीही करण्यात आली.
सर्वसामान्य रुग्णांना उपचारासाठी ताटकळत ठेवणे किंवा प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे त्यांना मनस्ताप सहन करावा लागणे हे सहन केले जाणार नाही. सर्व समस्या लवकर सोडवल्या नाहीत तर ‘शिवसेना स्टाईल’ने आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा शिष्टमंडळाने दिला. या वेळी उपतालुकाप्रमुख महेंद्र चव्हाण, सुभाष रहाटे, विभागप्रमुख किरण तोडणकर, प्रसन्न उर्फ बंड्या सुर्वे, नगरसेवक अमित विलणकर, केतन शेटे, दिलावर गोदड, बाबू चव्हाण आदी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button