
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात २५ वे देहदानविजया आगाशे यांच्या मरणोत्तर देहदानातून समाजप्रबोधनाचा आदर्श; वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या अभ्यासासाठी देह सूपूर्द
*रत्नागिरी, दि. ८ : ‘मरणोत्तर देहाचा उपयोग भावी डॉक्टरांच्या ज्ञानसाधनेसाठी आणि संशोधनासाठी व्हावा’ या उदात्त हेतूने आगाशे कुटुंबियांनी घेतलेल्या संवेदनशील आणि पुरोगामी निर्णयामुळे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात २५ वे देहदान झाले.
येथील हेड पोस्ट ऑफिस जवळील आगाशेवाडा येथील रहिवासी विजया नारायण आगाशे (वय ९१ वर्ष) यांचे मंगळवार, दि. ६ ऑक्टोबर २०२६ रोजी वृद्धापकाळाने निधन झाले. सामाजिक जाणीव आणि वैज्ञानिक दृष्टिकोन जोपासत कै. विजया आगाशे यांनी हयातीतच दि. १७ जून २०२६ रोजी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात मरणोत्तर देहदानाचे इच्छापत्र सादर केले होते.
त्यांच्या या अंतिम इच्छेचा आणि संकल्पाचा आदर करत त्यांचे सुपुत्र मुकुंद आगाशे, विवेक आगाशे, नातू हर्षद आगाशे, नितीन महाबळ तसेच ऐश्वर्या आगाशे यांनी पुढाकार घेऊन दि. ०७ ऑक्टोबर २०२६ रोजी त्यांचा पार्थिव देह शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडे सुपूर्द केला. कुटुंबियांच्या या निर्णयाने वैद्यकीय क्षेत्रात नवा आदर्श निर्माण केला आहे.
हे देहदान शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांच्या मार्गदर्शनाखाली स्वीकारण्यात आले. या संपूर्ण प्रक्रियेसाठी शरीररचनाशास्त्र विभागप्रमुख (Anatomy) डॉ. सादिकअली सय्यद, डॉ. योगिता कांबळे, समाजसेवा अधीक्षक श्री. रेशम जाधव यांच्यासह विभागातील पूर्वा तोडणकर, भूमी पारकर, प्रियल आडीवरेकर, मिथिलेश मुरकर, मिहीर लोंढे, श्रेयश जोशी, राज पेडणेकर तसेच वाहनचालक प्रीतम भोसले, प्रथमेश पवार आणि नितीन घोसाळकर यांनी परिश्रम घेतले.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात झालेले हे २५ वे देहदान असून, याबद्दल महाविद्यालयाच्या वतीने आगाशे कुटुंबियांच्या सामाजिक व पुरोगामी भूमिकेबद्दल मनःपूर्वक कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.




