
विदुषी अलका देव-मारुलकरांच्या दैवी स्वरांनी रसिक मंत्रमुग्ध
समर्पण २०२६; रत्नागिरी, गोव्यातील कलाकारांनी रंगवली शास्त्रीय मैफल
रत्नागिरी : ‘श्री’ रागाबरोबरच ‘वरदश्री’ आणि ‘आनंदकल्याण’ या स्वनिर्मित रागांतील बंदिशी आपल्या दैवी आवाजात सादर करत विदुषी डॉ. अलकाताई देव-मारुलकर यांची अवघे प्रेक्षागृह भारावून टाकण्याची किमया गोवा आणि रत्नागिरीतील संगीतप्रेमींनी अनुभवली. वाढदिवसाचा अमृतमहोत्सव साजरा करणाऱ्या अलकाताईंच्या मैफलीतून रसिकांनी ग्वाल्हेर, किराणा आणि जयपूर घराण्याच्या गायकीची झलक रसिकांना मंत्रमुग्ध करून गेली.
आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या नामवंत शास्त्रीय गायिका विदुषी डॉ. अलकाताई यांच्या अमृत महोत्सवानिमित्त “समर्पण २०२६” हा कै. सुरेश आणि शशिकांत डुबळे स्मृति बारावा शास्त्रीय संगीत समारोह रत्नागिरीत नुकताच पार पडला. दोन दिवस चाललेल्या हा महोत्सव पर्वरी गोवा येथील प्रियांशु सांस्कृतिक संस्था, कला व संस्कृती संचालनालय, गोवा आणि स्वराभिषेक-रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाच्या राधाबाई शेट्ये सभागृहात झाला. यामध्ये गोवा आणि रत्नागिरीतील कलाकारांनीही डॉ. अलकाताईंच्या विविध बंदिशी सादर केल्या. पहिल्या दिवशी स्वराभिषेकचे शिष्य मीरा बापट, स्वरा भागवत, मृणाल जोशी, हर्षदा सावंत, ऋग्वेदा हळबे, दिया परब यांनी डॉ. अलकाताईंनी गोरखकल्याण रागात संगीतबद्ध केलेले ईशस्तवन सादर केले. त्यानंतर ऋग्वेद तेरेदेसाई, साई शिर्के, अन्वी आठल्ये आणि नीलश्री लोटलीकर यांनी राग भीमपलासमधील सरगमगीत व एक छोटा ख्याल गायला. पहिल्या दिवशीचा समारोप डॉ. अलकाताईंच्या शास्त्रीय गायनाने झाला. त्यांनी श्री रागातील बंदिशीनंतर स्वनिर्मित वरदश्री आणि आनंदकल्याण राग सादर केला. त्यांना अजय जोगळेकर (संवादिनी) आणि गोव्याचे डॉ. उदय कुलकर्णी (तबला) हे साथसंगत केली. महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी सकाळच्या सत्रात स्वराभिषेकचे शिष्य तन्वी मोरे हिने राग अहिरभैरवातील छोटा ख्याल, तराणा व त्यानंतर एक ठुमरी सादर केली. भटियारा रागाचे गायन चैतन्य परब (रत्नागिरी) याने केले. तर गोव्याच्या डॉ. शिल्पा डुबळे परब यांच्या देसी रागाने रसिकांना खिळवून ठेवले. दुपारच्या सत्रात स्वराभिषेकच्या शिष्या दीप्ती आगाशे, ऐश्वर्या सावंत, गौतमी वाडकर, राधा केळकर यांनी राग भीमपलासमधील बडा व छोटा ख्याल, गोव्याच्या श्रेया देवधर हिने गौडमल्हारमधील बडा व छोटा ख्याल सादर केला. मैफलीच्या समारोप तेजा ढवळीकर, समीक्षा काकोडकर, विनया परब यांनी सादर केलेल्या मधुवंती रागातील बंदिश आणि दादऱ्याने झाला.
दोन दिवसांच्या या महोत्सवात हार्मोनियम साथ चैतन्य पटवर्धन, मंगेश मोरे, वरद सोहनी, तर तबलासाथ केदार लिंगायत, प्रथमेश शहाणे, अभिषेक भालेकर आणि उत्पल सायनेकर (मुंबई) यांनी केली. ध्वनी संयोजन एस. कुमार साऊंडचे उदयराज सावंत यांनी, तर उत्तम निवेदन सौ. पूर्वा साने यांनी केले. कार्यक्रमादरम्यान डॉ. अलकाताई आणि ज्येष्ठ संगीत समुपदेशक, संगीतकार मुंबईतील कलांगणच्या संस्थापिका डॉ. वर्षा भावे यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी माजी प्राचार्य डॉ. दत्ता पवार, अॅड. राजशेखर मलुष्टे यांच्यासह अलकाताईंच्या अनेक शिष्याही उपस्थित होत्या. अतिशय नेटके आयोजनाबद्दल स्वराभिषेक आणि गोव्यातील शिष्यवर्गाचे उपस्थितांनी कौतुक केले.
आनंदवनातील निर्मित रागाची कथा
चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा येथे स्थित डॉ. बाबा आमटे यांच्या आनंदवन आश्रमातील आनंददायी वातावरण आणि लोककल्याणकारी कार्याने भारावून तिथे एका रागाची निर्मिती केल्याचे विदुषी डॉ. अलकाताई देव-मारुलकर यांनी यावेळी सांगितले. नंद आणि कल्याण रागाचे मिश्रण असलेला हा राग आनंदवनातील आनंद आणि तेथे होणारे सर्वांचे कल्याण यावरून त्याला आनंदकल्याण हे समर्पक नाव त्यांनी दिले आहे.




