
सौंदळ रेल्वे स्थानकाचा सर्वांगीण विकास करासीएसएमटी–सावंतवाडी रेल्वेगाडीला कायमस्वरूपी थांबा देण्याची मागणी; खासदार नारायण राणे यांना निवेदन
राजापूर तालुक्यातील सौंदळ रेल्वे स्थानकावर प्रवाशांसाठी आवश्यक मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याबरोबरच नव्याने सुरू झालेल्या सीएसएमटी–सावंतवाडी अप-डाऊन रेल्वेगाडीला सौंदळ येथे कायमस्वरूपी थांबा द्यावा, तसेच अन्य महत्त्वाच्या रेल्वेगाड्यांनाही येथे थांबा मंजूर करावा, अशी मागणी सौंदळ रेल्वे स्थानक संघर्ष समिती आणि ग्रामस्थांनी केली आहे.
याबाबत समितीच्या शिष्टमंडळाने नुकतेच रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे खासदार नारायण राणे यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. यावेळी सौंदळ रेल्वे स्थानकाशी संबंधित विविध प्रश्नांवर खासदार राणे यांच्याशी चर्चा करण्यात आली.
सौंदळ येथे रेल्वे स्थानक असूनही प्रवाशांना अनेक मूलभूत सुविधांपासून वंचित राहावे लागत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. स्थानकावर आवश्यक उंचीचे फलाट, फलाटावर छप्पर, विद्युत प्रकाश व्यवस्था, सार्वजनिक शौचालय व वॉशरूम, प्रवासी प्रतीक्षालय, स्थानकाला जोडणारा योग्य रस्ता तसेच वाहन पार्किंगची सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली आहे.
तसेच नुकतीच सुरू झालेल्या सीएसएमटी–सावंतवाडी अप-डाऊन रेल्वेगाडीला सौंदळ येथे कायमस्वरूपी थांबा देण्याची मागणीही करण्यात आली आहे. या गाडीला सौंदळ येथे थांबा मिळाल्यास राजापूर तालुक्याच्या पूर्व भागासह पाचल परिसर तसेच कोल्हापूर जिल्ह्यातील अनुस्कुरा परिसरातील सुमारे ७० ते ८० गावांतील प्रवाशांना त्याचा मोठा फायदा होणार असल्याचे समितीने निवेदनात म्हटले आहे.
सौंदळ रेल्वे स्थानक हे आंबा-पाचल, अनुस्कुरा तसेच कोल्हापूरकडे जाणाऱ्या प्रमुख मार्गावर आहे. त्यामुळे या परिसरातील नागरिकांसाठी सौंदळ स्थानक रेल्वे प्रवासाच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरू शकते. मात्र सध्या सावंतवाडीला जाणाऱ्या गाडीव्यतिरिक्त अन्य रेल्वेगाड्यांना नियमित थांबा नसल्याने प्रवाशांना इतर स्थानकांवर जावे लागत असल्याचे ग्रामस्थांनी निदर्शनास आणून दिले.
महिला, लहान मुले, ज्येष्ठ नागरिक तसेच सर्वसामान्य प्रवाशांच्या सोयीचा विचार करून सौंदळ रेल्वे स्थानकाचा सर्वांगीण विकास करावा, आवश्यक मूलभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात आणि सीएसएमटी–सावंतवाडी रेल्वेगाडीला तातडीने कायमस्वरूपी थांबा मंजूर करावा, अशी मागणी समितीने केली आहे.
यावेळी खासदार नारायण राणे यांनी सौंदळ रेल्वे स्थानकाशी संबंधित प्रश्नांची माहिती जाणून घेतली. रेल्वे स्थानकाच्या विविध मागण्यांबाबत रेल्वेमंत्र्यांशी चर्चा करून हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन त्यांनी शिष्टमंडळाला दिले.
यावेळी सौंदळ रेल्वे स्टेशन संघर्ष समितीचे अध्यक्ष काशिनाथ पाटील, उपाध्यक्ष प्रकाश तळेकर, सचिव गजानन पेंडलकर, धोंडू लांजेकर, खजिनदार सचिन घाग, प्रसिद्धीप्रमुख संजय मांजरे, जगदीश राणे, सल्लागार सुनील पाटील, श्रीधर गिरकर, कृष्णा चव्हाण, बाबामिया पिरखान तसेच समितीचे अन्य सदस्य उपस्थित होते.




