‘परवानगीची मिजास उतरवणारच’; डीजेच्या मुद्द्यावर विद्यानंद बापट आक्रमक

गणेश मंडळांकडून बॅनर, एलईडीद्वारे टीका; बापटांकडून ध्वनिप्रदूषण आणि वाहतूक कोंडीविरोधात भूमिका कायम

पुणे :;गणेश विसर्जन मिरवणुकीतील डीजेच्या दणदणाटावरून पुण्यात पुन्हा एकदा वादाला तोंड फुटले आहे. ध्वनिप्रदूषण आणि विसर्जन मिरवणुकीदरम्यान होणाऱ्या वाहतूक कोंडीविरोधात आवाज उठविणारे सामाजिक कार्यकर्ते विद्यानंद बापट यांच्यावर काही गणेश मंडळांकडून बॅनर, एलईडी स्क्रीन आणि देखाव्यांच्या माध्यमातून टीका करण्यात आली. त्यावर बापट यांनी आक्रमक प्रतिक्रिया देत ‘परवानगीची मिजास उतरवणारच’, असा इशारा दिला आहे.

गणेश विसर्जन मिरवणुकीत ढोल-ताशांसोबत डीजेचा वापर करण्यात आल्याने ध्वनिप्रदूषणाचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला. ‘तुम्ही कितीही विरोध केला तरी आम्ही डीजे आणलाच’, असा संदेश देत काही मंडळांनी बापट यांच्या भूमिकेवर टीका केल्याचे चित्र मिरवणुकीदरम्यान पाहायला मिळाले. या पार्श्वभूमीवर बापट यांनी आपला विरोध कोणत्याही व्यक्ती किंवा गणेशोत्सवाला नसून नागरिकांना होणाऱ्या त्रासाला असल्याचे स्पष्ट केले.

“परवानगी मिळाली म्हणून नागरिकांना त्रास देण्याचा अधिकार मिळत नाही. ध्वनिप्रदूषण आणि वाहतुकीला अडथळा निर्माण करणाऱ्या प्रकारांना माझा विरोध कायम राहील,” असे बापट यांनी म्हटले.

दरम्यान, प्रतिक्रिया देताना बापट यांनी काही उत्सवप्रेमींच्या श्रद्धा आणि आहारपद्धतीवरून अत्यंत आक्षेपार्ह आणि अवमानकारक भाषा वापरली. गोमूत्र आणि गोमयाशी संबंधित धार्मिक प्रथांचा उल्लेख करत त्यांनी संबंधितांवर तीव्र शब्दांत टीका केली. त्यांच्या या वक्तव्यामुळे वाद अधिक वाढण्याची शक्यता आहे.

‘भाषा बदललेली नाही; वस्तुस्थिती सांगतोय’

आपल्या पूर्वीच्या भूमिकेपेक्षा यावेळी भाषा अधिक आक्रमक असल्याच्या प्रश्नावर बापट यांनी आपली भूमिका बदललेली नसल्याचे सांगितले. गोमूत्र पिणे किंवा गोमय सेवन करण्यासंदर्भातील काही व्हिडिओंचा संदर्भ देत, “हे एआय जनरेटेड व्हिडिओ नाहीत; प्रत्यक्ष व्हिडिओ पाहायला मिळतात. त्यामुळे मी वस्तुस्थितीचे वर्णन करतोय,” असा दावा त्यांनी केला.

‘गणेशोत्सवाला विरोध नाही’

गणेशोत्सव साजरा करण्यास आपला विरोध नसल्याचेही बापट यांनी स्पष्ट केले. मात्र उत्सवाच्या नावाखाली नागरिकांना ध्वनिप्रदूषण, वाहतूक कोंडी आणि इतर समस्यांना सामोरे जावे लागू नये, अशी त्यांची भूमिका आहे. “तुमचा उत्सव साजरा करा; मात्र त्याचा त्रास इतर नागरिकांना होऊ नये,” असे ते म्हणाले.

मंडळांकडून आपल्याविरोधात बॅनर लावले किंवा एलईडी स्क्रीनवरून टीका केली तरी ध्वनिप्रदूषणाविरोधातील आपली भूमिका बदलणार नसल्याचे बापट यांनी स्पष्ट केले. त्यामुळे पुण्यातील गणेश विसर्जन मिरवणुकीतील डीजेचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button