
लालपरी’च्या प्रवाशांसाठी मोठी बातमी! १ ऑक्टोबरपासून ज्येष्ठ नागरिक, महिलांना NCMC कार्ड अनिवार्य
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) विविध सवलत योजनांचा लाभ घेणाऱ्या अमृत ज्येष्ठ नागरिक, ज्येष्ठ नागरिक आणि महिला प्रवाशांसाठी १ ऑक्टोबर २०२६ पासून NCMC कार्ड अनिवार्य करण्यात येणार आहे.सवलतीचे तिकीट देताना NCMC कार्डचा वापर करण्याचा निर्णय एसटी महामंडळाने घेतला असून, त्यासाठी कार्ड नोंदणी व वितरणाची प्रक्रिया राज्यभरातील आगार आणि बसस्थानकांवर सुरू करण्यात आली आहे, अशी माहिती MSRTCने अधिकृत एक्स पोस्टच्या मार्फत दिली.
१ ऑक्टोबरपासून सवलतीचे तिकीट NCMC कार्डमधूनच वितरित केले जाणार
एसटी महामंडळाकडून विविध सामाजिक घटकांना शासन निर्देशानुसार सवलतीच्या दरात प्रवासाची सुविधा दिली जाते. त्यामध्ये अमृत ज्येष्ठ नागरिक, ज्येष्ठ नागरिक तसेच महिला प्रवाशांना मिळणाऱ्या सवलतीचा समावेश आहे. या सवलतीच्या प्रवासाचे अधिक सुलभ आणि डिजिटल व्यवस्थापन करण्यासाठी NCMC कार्ड प्रणालीचा वापर करण्यात येत आहे. १ ऑक्टोबरपासून सवलतीचे तिकीट NCMC कार्डमधूनच वितरित केले जाणार आहे. त्यामुळे ज्येष्ठ नागरिक आणि महिला सवलतधारक प्रवाशांनी त्यापूर्वी NCMC कार्डची नोंदणी करून घेणे आवश्यक आहे. ज्या प्रवाशांकडे कार्यरत (Active) NCMC कार्ड आहे किंवा कार्ड नोंदणी केल्याची QR कोड असलेली पावती आहे, त्यांना सवलतीचा लाभ मिळणार आहे.




