गवा रेड्याच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्या स्वप्नीलच्या कुटुंबाला वन विभागाच्या अधिकाऱ्यांकडून शासकीय मदतीचा धनादेश


काही दिवसांपूर्वी देवरुख साडवली येथील सह्याद्री नगर परिसरातील ३४ वर्षीय स्वप्नील पेंडामकर यांच्यावर आंबव येथे गवा रेड्याने हल्ला केला. या हल्ल्यात स्वप्नील गंभीर जखमी झाले होते. त्यांच्यावर वेळीच उपचार सुरू करण्यात आले; मात्र उपचारांना प्रतिसाद न मिळाल्याने चौथ्या दिवशी त्यांची प्राणज्योत मालवली. या दुर्दैवी घटनेने संपूर्ण परिसरावर शोककळा पसरली.

स्वप्नील यांच्या निधनाची बातमी समजताच त्यांचे नातेवाईक, मित्रपरिवार आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने धावून आले. मात्र, “पहिला नातेवाईक म्हणजे आपला शेजारी” या भावनेतून सह्याद्री नगर मित्रमंडळ आणि त्यांचे कार्यकर्ते स्वप्नील यांच्या कुटुंबीयांच्या मदतीसाठी ठामपणे उभे राहिले.सणाचा जल्लोष बाजूला ठेवत मित्रमंडळातील वयोवृद्ध, तरुण तसेच बालकांनीही या कठीण प्रसंगी शक्य त्या पद्धतीने मदतीचा हात पुढे केला. आर्थिक मदत, प्रत्यक्ष धावपळ, शारीरिक मदत तसेच प्रसंगावधान राखत कुटुंबीयांना आधार देण्याचे काम मंडळाच्या कार्यकर्त्यांनी केले.

स्वप्नील यांच्या कुटुंबाला योग्य ती मदत आणि न्याय मिळावा, यासाठी सह्याद्री नगर मित्रमंडळाने केवळ स्थानिक पातळीवर मदत करून न थांबता स्थानिक लोकप्रतिनिधी तसेच वन विभागाच्याअधिकाऱ्यां च्या निदर्शनास ही घटना आणून दिली. वन्यप्राण्यांच्या हल्ल्यामुळे झालेल्या मानवी हानीबाबत शासनस्तरावरून मदत मिळावी, यासाठीही मंडळाने सातत्याने पाठपुरावा केला.
याच पाठपुराव्याला यश मिळून वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी स्वप्नील यांच्या आईकडे शासकीय मदतीचा धनादेश सुपूर्द केला.
यामुळे स्वप्नीलच्या कुटुंबीयांना काहीसा दिलासा मिळाला.

दुःखाच्या प्रसंगी केवळ सहानुभूती न दाखवता प्रत्यक्ष मदतीसाठी पुढे येणाऱ्या “सह्याद्री नगर मित्रमंडळाच्या” कार्यकर्त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

वन विभागाने दिलेल्या सकारात्मक प्रतिसादाबद्दल विभागीय वनधिकारी गिरीजा देसाई, सहाय्यक वन संरक्षक प्रियांका लगड, परीक्षेत्र वनअधिकारी विक्रम गुरव,वनपाल देवरुख सागर गोसावी, वनरक्षक साखरपा सहयोग कराडे, वन रक्षक आरवली सूरज तेली, वन रक्षक दाभोळे सुप्रिया काळे वन रक्षक फुणगुस आकाश कुडकर आदींचे विशेष आभार मानण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button