
साहिल वाकोडेसोबत IIT मुंबईतील परीक्षा गृहात नेमकं काय घडलं? CCTV फुटेज समोर!
Claim of use of ChatGPT; No action from administration : आयआयटी मुंबईमधील द्वितीय वर्षाचा विद्यार्थी साहिल वाकोडे याच्या आत्महत्या प्रकरणाला आता एक नवीन आणि महत्त्वाचे वळण मिळाले आहे. साहिलने टोकाचे पाऊल उचलण्यापूर्वी परीक्षा गृहात नक्की काय घडले होते, याचे सीसीटीव्ही फुटेज आता समोर आले आहे.
परीक्षा सुरू असताना पर्यवेक्षकाने साहिलला थांबवून बाजूला नेल्याचे या फुटेजमध्ये स्पष्ट दिसत आहे. या घटनेनंतर काही तासांतच साहिलचा मृतदेह त्याच्या हॉस्टेलमधील खोलीत आढळून आला होता. या संदर्भातील वृत्त NDTV या वृत्तसंस्थेने दिले आहे.
परीक्षा गृहातील ‘ते’ शेवटचे ५० मिनिटे; सीसीटीव्ही फुटेजमध्ये काय दिसल?
समोर आलेल्या फुटेजमध्ये गेल्या शुक्रवारी पार पडलेल्या परीक्षेदरम्यानची संपूर्ण घटना कैद झाली आहे. काळ्या रंगाचा टी-शर्ट परिधान केलेला साहिल परीक्षा गृहातील पहिल्याच रांगेत बसलेला दिसत आहे. पेपर संपण्यास अवघी काही मिनिटे शिल्लक असताना (साधारण दुपारी १२:३० ते १२:४५ दरम्यान) साहिल वाकून खिशातील काहीतरी पाहण्याचा प्रयत्न करत असल्याचे फुटेजमध्ये दिसून येते. पर्यवेक्षक म्हणून उपस्थित असलेले प्राध्यापक त्याच्याजवळ येतात. साहिल काही वेळासाठी बेंचवरून उठतो, पुन्हा बसतो आणि नंतर आपला मोबाईल फोन पर्यवेक्षकांकडे सुपूर्द करतो.
प्राध्यापक आणि साहिल यांच्यात काही वेळ संभाषण होते. त्यानंतर प्राध्यापक त्याला इतर विद्यार्थ्यांपासून दूर एका बाजूला घेऊन जातात. त्यानंतर साहिल आपले सर्व साहित्य गोळा करून परीक्षा गृहातून बाहेर पडताना दिसतो. लॉबीतील सीसीटीव्हीनुसार, दुपारी १:२५ च्या सुमारास साहिलने हॉस्टेलमधील स्वतःच्या खोलीत प्रवेश केला. त्यानंतर तो पुन्हा बाहेर आलाच नाही आणि काही तासांनंतर त्याने आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना समोर आली.
चॅटजीपीटीच्या वापराचा दावा; प्रशासनाकडून कोणतीही कारवाई नाही
आयआयटी बॉम्बे प्रशासनाने या दुर्दैवी घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे. संस्थेने दिलेल्या माहितीनुसार, साहिल परीक्षेदरम्यान मोबाईलचा वापर करत असल्याचे आढळले होते. उत्तरांसाठी त्याने प्रश्नपत्रिका चॅटजीपीटीवर अपलोड केली होती. मात्र, त्याच्यावर कोणतीही शिस्तभंगाची कारवाई करण्यात आली नव्हती, असेही प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
“माझ्या मुलाचा जातीय छळ झाला”; पालकांचे गंभीर आरोप
दरम्यान, या घटनेनंतर साहिलच्या पालकांनी आयआयटी प्रशासनावर आणि एका प्राध्यापकावर अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. साहिलला संस्थेत जातीय भेदभावाचा सामना करावा लागत होता, असा आरोप त्याचे वडील रवींद्र वाकोडे आणि आई सोनाली वाकोडे यांनी केला आहे.
“प्राध्यापक सूर्यनारायण डुल्ला हे माझ्या मुलासोबत जातीय भेदभाव करायचे. साहिलने मला याबद्दल आधीच सांगितले होते. पण आयआयटीमध्ये प्रवेश मिळणे कठीण असते, त्यामुळे मी त्याला थोडे सहन करण्याचा सल्ला दिला होता,” असा खळबळजनक खुलासा साहिलच्या वडिलांनी माध्यमांशी बोलताना केला.
CCTV visuals of IIT Bombay Exam room 🚨
Phone is in hands of Sahil Wakode 📷
invigilator caught him cheating and asks him to hand over his phone to him.
IITBombaypic.twitter.com/2zIIXbCyGA
— Anakshi (@possesive_gurl) September 23, 2026
पोलिसांच्या हाती लागले महत्त्वाचे सीसीटीव्ही फुटेज
सहाय्यक पोलिस आयुक्त (ACP) धरमवीर बनसोड यांच्या नेतृत्वाखालील गुन्हे शाखेचे पथक या फुटेजचे सखोल विश्लेषण करणार आहे. माहितीनुसार, “आयआयटी कॅम्पसमधील वर्गखोल्या आणि लॉबीमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत, यामध्ये परीक्षा गृहात घडलेली ही घटना कैद झाली आहे. दुपारी १ वाजता पेपर संपण्यापूर्वी अवघ्या काही मिनिटांआधी, म्हणजेच साडेबारा ते पावणे एकच्या दरम्यान, संबंधित विद्यार्थी थोडा वाकून आपल्या खिशातील काहीतरी न्याहाळत असल्याचं फुटेजमध्ये दिसत आहे. प्राध्यापक त्याला याचबाबत प्रश्न विचारत असल्याचंही फुटेजमध्ये दिसून येत आहे. त्यानंतर ते त्याला इतर विद्यार्थ्यांपासून दूर एका बाजूला घेऊन जातात.”




