
जामदा धरण पुनर्वसनात 1000 बोगस घरांचा महाघोटाळा, मनसे आक्रमक – SIT चौकशीची मागणी
राजापूर : तालुक्यातील बहुचर्चित काजिर्डा-जामदा धरण प्रकल्पाच्या पुनर्वसनात कोट्यवधी रुपयांचा महाघोटाळा झाल्याचा गंभीर आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे दक्षिण रत्नागिरी जिल्हाध्यक्ष अविनाश सौंदळकर यांनी केला आहे. याप्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि जलसंपदा मंत्री यांच्याकडे त्यांनी लेखी निवेदन देऊन सखोल चौकशीची मागणी केली आहे.
हा जामदा प्रकल्प सिंचन घोटाळ्यातील प्रकल्प असून गेल्या 30 वर्षांपासून अपूर्णावस्थेत आहे. सुरुवातीपासूनच या प्रकल्पाला ग्रामस्थांचा विरोध होता. मागील दोन वर्षांपासून धरणाचे पुनर्वसन आणि बुडीत क्षेत्रातील घरांचे सर्वेक्षण सुरू आहे. या सर्वेक्षणात मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार होत असल्याचा संशय ग्रामस्थांनीही व्यक्त केला आहे.
700 घरांची 1700 घरे कशी झाली?
सौंदळकर यांनी निवेदनात म्हटले आहे की, यापूर्वी गावात 700 घरे होती. मात्र दलाल आणि संबंधित अधिकाऱ्यांच्या संगनमताने बुडीत क्षेत्रात हा आकडा 1700 वर पोहोचला आहे. याचाच अर्थ सुमारे 1000 घरे बोगस असल्याचा दाट संशय आहे.
40-60 च्या बॉण्डवर फसवणूक
जमीन मालकांकडून 40-60 च्या बॉण्डवर सह्या घेऊन शेतकऱ्यांची फसवणूक केली जात आहे. तसेच फळबागायतीच्या मोजणीतही मोठा घोटाळा झाला असून झाडांच्या फांद्या रोवून आणि नवीन रोपे लावून लाखो रुपये लाटण्यात आल्याचा आरोप आहे.
एका व्यक्तीची 20 घरे
सर्वात धक्कादायक बाब म्हणजे बुडीत क्षेत्रात एकाच व्यक्तीने 100 एकरपेक्षा जास्त जमीन खरेदी करून वेगवेगळ्या नावांनी 15 ते 20 घरे उभारली आहेत. हा सर्व प्रकार दलाल व संबंधित अधिकारी यांच्या संगनमताशिवाय होणे अशक्य असल्याचा आरोप सौंदळकर यांनी केला आहे.
या संपूर्ण प्रकरणाची SIT मार्फत किंवा अधीक्षक अभियंता, कोकण विभाग यांच्यामार्फत चौकशी करावी आणि बोगस लाभार्थ्यांची व संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.




