
जी.जी.पी. एस. प्रशालेचा फुटबॉल संघ कोल्हापूर विभागीय स्पर्धेसाठी पात्र
रत्नागिरी : क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे व रत्नागिरी क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय १४ वर्षाखालील मुलांची शालेय फुटबॉल स्पर्धा गोगटे- जोगळेकर महाविद्यालयाच्या जवाहार मैदानावर झाली. यात जी. जी. पी.एस. प्रशालेच्या मुलांच्या संघाने अंतिम सामन्यात एसपीएम, चिपळूण संघावर मात करत विजेतेपद प्राप्त केले. आता हा संघ कोल्हापूर विभागीय स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे.
अंतिम सामना खूपच अटीतटीचा झाला. या चालू वेळेत सामना ०-० बरोबरीत राहिला. त्यामुळे पेनल्टी शूटआउटवर सामना घेण्यात आला. यामध्ये जी.जी.पी.एस.च्या हुसेन खान, अदिन मजगावकर व अथर्व कडू यांनी गोल करून अंतिम निकाल ३-१ असा आपल्या नावावर केला. संघाचा कर्णधार सोहम चव्हाण, आदित्य राणे, नंदन फुटक व गोलकीपर अथर्व कडू यांनी आपल्या खेळाचे चांगले प्रदर्शन केले.
आता गडहिंग्लज कोल्हापूर येथे होणाऱ्या विभागीय स्पर्धेसाठी जी.जी.पी.एस. प्रशालेचा फुटबॉल संघ पात्र ठरला. याबद्दल रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीचे सर्व पदाधिकारी, जी. जी. पी. एस. मुख्याध्यापिका सौ. सोनाली पाटणकर, प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. अपूर्वा मुरकर, पूर्व प्राथमिक विभाग प्रमुख सौ.शुभदा पटवर्धन आणि गुरुकुल प्रमुख वासुदेव परांजपे यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.




