१७ वर्षे, ५,५०० कोटींची वाढ… तरीही मुंबई-गोवा महामार्ग अपूर्णच!


मूळ खर्च ११,४०९ कोटींवरून तब्बल १६,९०९ कोटींवर; परशुराम घाट-आरावली पॅकेजचा खर्च १२६ टक्क्यांनी वाढला


मुंबई : मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाला १७ वर्षांचा कालावधी उलटूनही प्रकल्प अद्याप पूर्णत्वास गेलेला नाही. त्यातच या प्रकल्पाच्या खर्चात तब्बल ५,५०० कोटी रुपयांची वाढ झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. माहिती अधिकारातून मिळालेल्या माहितीनुसार, महामार्गाच्या १० पॅकेजचा मूळ मंजूर खर्च ११,४०९.१४ कोटी रुपये होता. हा खर्च आता तब्बल १६,९०९.२२ कोटी रुपयांवर पोहोचला आहे. म्हणजेच प्रकल्पाच्या खर्चात सुमारे ४८ टक्क्यांची वाढ झाली आहे.

माहिती अधिकार कार्यकर्ते जितेंद्र घाडगे यांनी मागवलेल्या माहितीतून ही बाब समोर आली आहे. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील महामार्ग क्रमांक ६६ च्या सुमारे ३५५ किलोमीटर चौपदरीकरणासाठीच्या १० पॅकेजच्या खर्चात मोठी वाढ झाली आहे.

परशुराम घाट-आरावली पॅकेजचा खर्च दुपटीहून अधिक

चिपळूण-रत्नागिरी परिसरातील परशुराम घाट-आरावली या पॅकेजमध्ये खर्चवाढ सर्वाधिक झाली आहे. या पॅकेजचा मूळ मंजूर खर्च ९८३ कोटी रुपये होता. तो आता तब्बल २,२२६ कोटी रुपयांवर पोहोचला आहे. म्हणजेच या पॅकेजच्या खर्चात तब्बल १२६ टक्क्यांची वाढ झाली आहे.

दरम्यान, आतापर्यंत मुंबई-गोवा महामार्गाच्या कामावर ११,५७७ कोटी रुपये खर्च झाल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे, हा खर्च प्रकल्पाच्या मूळ मंजूर अर्थसंकल्पापेक्षाही अधिक झाला असतानाही महामार्गाचे काम अद्याप पूर्ण झालेले नाही.

गणेशोत्सवात कोकणवासीयांची पुन्हा ससेहोलपट

मुंबई-गोवा महामार्गाच्या रखडलेल्या कामाचा सर्वाधिक फटका गणेशोत्सवाच्या काळात कोकणवासीयांना बसतो. मुंबई आणि उपनगरांत राहणारे लाखो कोकणवासी गणेशोत्सवासाठी दरवर्षी आपल्या गावी रवाना होतात. साधारण सात तासांत पूर्ण होणारा प्रवास अनेकदा १२ तासांहून अधिक काळ चालतो.

अपूर्ण कामे, खड्डे, अरुंद एकेरी मार्ग, अपूर्ण पूल आणि वाहतूक कोंडी यामुळे प्रवाशांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागते. गणेशोत्सवाच्या काळात तर महामार्गावरील वाहतूक कोंडी अधिकच तीव्र होत असल्याचे चित्र दिसते.

समृद्धी महामार्ग सात वर्षांत; मुंबई-गोवा महामार्गाला १७ वर्षे!

मुंबई-गोवा महामार्गाच्या कामातील दिरंगाईची तुलना राज्यातील ७०१ किलोमीटर लांबीच्या समृद्धी महामार्गाशी केली जात आहे. समृद्धी महामार्गाचा पूर्णपणे नवीन प्रकल्प अवघ्या सात वर्षांच्या कालावधीत उभारण्यात आला. मात्र, आधीपासून अस्तित्वात असलेल्या मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी तब्बल १५ ते १७ वर्षांचा कालावधी उलटूनही काम पूर्ण झालेले नाही.

२०१६ पर्यंत महामार्ग पूर्ण होणे अपेक्षित होते

मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाला २०११ मध्ये सुरुवात झाली. सुमारे ४४० किलोमीटरच्या या महामार्गाचे काम २०१६ पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र, भूसंपादन, विविध बांधकामपूर्व मंजुरी आणि कंत्राटदारांशी संबंधित अडचणींमुळे प्रकल्पाला वारंवार विलंब झाला.

केंद्र सरकारने २०२४ मध्ये संसदेत दिलेल्या माहितीनुसार, भूसंपादनातील अडचणी तसेच काही कंत्राटदारांना आलेल्या आर्थिक अडचणी या प्रकल्पाच्या विलंबामागील प्रमुख कारणांपैकी असल्याचे नमूद करण्यात आले होते.

पथकर सुरू, पण कामे अजूनही सुरूच!

महामार्गावरील खारपाडा पथकर नाक्यावर मे महिन्यात पथकर वसुली सुरू झाली. मात्र, दुसरीकडे महामार्गाच्या काही भागांत अद्याप कामे आणि दुरुस्ती सुरू असल्याचे चित्र आहे. त्यामुळे ‘पथकर वसुली सुरू, पण महामार्ग पूर्ण कधी?’ असा सवाल प्रवाशांकडून उपस्थित केला जात आहे.

महामार्गावरील एका उड्डाणपुलाचा २०२१ मध्ये झालेला अपघातही सुरक्षेच्या दृष्टीने गंभीर प्रश्न निर्माण करणारा ठरला होता.

१७ वर्षांचा कालावधी, हजारो कोटींची वाढ आणि तरीही अपूर्ण महामार्ग—मुंबई-गोवा महामार्गाचा हा रखडलेला प्रवास नेमका कधी संपणार, हा प्रश्न आजही कोकणवासीयांसमोर कायम आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button