
न्यायालये तपासाच्या कक्षेबाहेर राहू शकत नाहीत, सरन्यायाधीश सूर्य कांत यांचा गंभीर मुद्दा!
Chief Justice Surya Kant : जनतेचा विश्वास संपादन करण्यासाठी न्यायालये स्वतःला तपासाच्या कक्षेबाहेर ठेवू शकत नाहीत. जनतेच्या प्रश्नांना, टीकेला आणि चौकशीला सामोरे जाण्यासाठी न्यायालयांनी तयारी ठेवलीच पाहिजे, असे महत्त्वपूर्ण मत सरन्यायाधीश सूर्य कांत यांनी सोमवारी व्यक्त केले.
राजधानी दिल्लीत आयोजित सहाव्या ‘राम जेठमलानी स्मृती व्याख्यानमाला’ कार्यक्रमात बोलताना त्यांनी हा गंभीर मुद्दा मांडला. न्यायाधीशांविरोधातील तक्रारी आणि न्यायव्यवस्थेचे उत्तरदायित्व आदी महत्त्वाच्या मुद्दय़ांवर सरन्यायाधीशांनी परखड भाष्य केले.
‘न्याय होताना दिसणे : न्यायव्यवस्थेचे आधारस्तंभ म्हणून पारदर्शकता व जनविश्वास’ या विषयावर व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली होती. या वेळी सरन्यायाधीश सूर्य कांत यांनी न्यायालयांना उत्तरदायित्वाची जाणीव करून दिली. संस्थात्मक उत्तरदायित्व आणि आत्मसुधारणेसाठी न्यायव्यवस्थेच्या कामकाजावर निष्पक्ष, माहितीपूर्ण आणि विधायक टीका होणे आवश्यकच आहे, असे सरन्यायाधीश म्हणाले. जनतेचा विश्वास ही न्यायव्यवस्थेची खरी ताकद आहे. मात्र हा जनतेचा विश्वास संपादन करण्यासाठी न्यायालये स्वतःला तपासाच्या कक्षेबाहेर ठेवू शकत नाहीत. उत्तरदायित्व म्हणून न्यायालयांनी टीका, छाननी आणि जनतेच्या प्रश्नांना सामोरे गेलेच पाहिजे. न्यायव्यवस्थेने एक संस्था म्हणून टीकेला विरोध करताच कामा नये, असे सरन्यायाधीशांनी नमूद केले. एनसीईआरटीच्या एका पाठ्यपुस्तकासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने अलीकडेच स्वतःहून दखल घेतली होती. त्याचा संदर्भ देत सरन्यायाधीशांनी ही परखड विधाने केली.
फक्त सुनावणी म्हणजे पारदर्शकता नव्हे!
न्यायालयीन कामकाजातील पारदर्शकता म्हणजे फक्त खुले कोर्टरूम आणि सार्वजनिक सुनावण्या नव्हे. न्यायालयांनी निकालामागील तर्क आणि कारणमीमांसा देणे आवश्यक आहे. त्याद्वारे त्यांनी आपला निकाल जनतेच्या छाननीसाठी खुला ठेवला पाहिजे, असे सरन्यायाधीशांनी म्हटले.
खऱ्या अर्थाने न्याय्य असलेल्या कोर्टात फरक
स्वतःची विशिष्ट मते किंवा सहानुभूती बाळगणाऱ्या मीडियासाठी खुले केलेले न्यायालय आणि खऱ्या अर्थाने न्याय्य असलेले न्यायालय यात फरक आहे. ‘न्याय झाल्याचे दिसणे’ या गोष्टीचे दोन पैलू आहेत. फक्त एखादा प्रकाशझोत चालू करण्यासारखी ही गोष्ट नाही, अशीही टिपण्णी सरन्यायाधीशांनी केली.
न्यायव्यवस्था एक संस्था म्हणून जनतेकडून होणारी टीका झटकूच शकत नाही. न्यायालयांच्या कामकाजावर निष्पक्ष, विधायक टीका होणे हे जिवंत घटनात्मक लोकशाहीचे कायदेशीर आणि आवश्यक वैशिष्टय़ आहे. त्यामुळे न्यायालयांनी आवश्यक तिथे होणाऱ्या टीकेला सामोरे जाण्याची तयारी ठेवलीच पाहिजे. – सूर्य कांत, सरन्यायाधीश




