
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील देवली-कुंभारमाठ मार्गावर भीषण मोटारसायकल अपघात; दोन अल्पवयीनांचा मृत्यू
एक जण गंभीर जखमी; कनकदेव येथील छोट्या पुलाजवळ मध्यरात्रीची दुर्घटना
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील देवली-कुंभारमाठ मार्गावर मंगळवारी रात्री सुमारे ११ वाजण्याच्या सुमारास झालेल्या भीषण मोटारसायकल अपघातात दोन अल्पवयीन मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी झाला. देवली-कनकदेव परिसरातील छोट्या पुलाजवळ ही दुर्घटना घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, कुंभारमाठ येथील कातकरी वस्तीतील एकाच कुटुंबातील तिघेजण युवक देवली येथे गेले होते. तेथून परतत असताना त्यांच्या मोटारसायकलला देवली-कनकदेव मार्गावर अपघात झाला.
या दुर्घटनेत ओंकार निकम (वय १२) आणि राजू अर्जुन निकम (वय १०) यांचा मृत्यू झाला. तर सचिन निकम हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना तातडीने उपचारासाठी गोवा येथील बांबुळी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
या अपघाताची माहिती मिळताच परिसरात हळहळ व्यक्त करण्यात आली. अपघात नेमका कोणत्या कारणामुळे झाला, याबाबत पुढील तपास सुरू आहे.




