‘मदत मागणे ही कमतरता नसून धैर्याची बाब : शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात ‘आत्महत्या प्रतिबंध दिना’निमित्त जनजागृती


रत्नागिरी, दि. १० ) – मानसिक आरोग्याविषयी समाजात सकारात्मक दृष्टिकोन निर्माण व्हावा आणि गरजूंपर्यंत वेळेत मदत पोहोचावी, या उद्देशाने येथील शासकीय वैद्यकीय रुग्णालयात ‘जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिना’निमित्त विशेष जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
रुग्णालयाच्या ओपीडी सभागृहात पार पडलेल्या या कार्यक्रमाला रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली.
कार्यक्रमात आत्महत्येचे प्रमाण रोखण्यासाठी आवश्यक उपाययोजना, ताण-तणाव व्यवस्थापन आणि मानसिक आरोग्याचे महत्त्व यावर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी ‘भारतीय न्याय संहिता कलम १०८’ या कायदेशीर पैलूबाबतही उपस्थितांना माहिती देण्यात आली. नैराश्य, तीव्र मानसिक तणाव किंवा आत्महत्येचे विचार येत असल्यास व्यक्तीने एकटे न कुढता तातडीने कुटुंबीय, मित्र किंवा मानसोपचार तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा, असे आवाहन करण्यात आले.
“मानसिक आरोग्याच्या समस्येतून जात असताना मदत मागणे ही आपली कोणतीही कमतरता नसून, ते एक धैर्याचे पाऊल आहे,” असा महत्त्वपूर्ण संदेश मानसोपचार तज्ज्ञ डॉ. स्नेहल तोडकर यांनी यावेळी दिला.
हा उपक्रम शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद आणि जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. भास्कर जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. या वेळी डॉ. अनिकेत शिरसाट, डॉ. राजेश आसोरे, डॉ. रश्मी आठल्ये, डॉ. सय्यद, समाजसेवा अधीक्षक कोमल गरड यांच्यासह आंतरवासिता (Intern) डॉक्टर्स, अधिपरिचारिका, मानसोपचार विभागातील समुपदेशक व इतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button