
हिंदी पंधरवड्याच्या नियोजनासाठी हिंदी शिक्षक कार्यकारिणी मंडळाची बैठक
२४ सप्टेंबरला युनायटेड इंग्लिश स्कूलमध्ये समारोप; शिक्षकांसाठी तंत्रज्ञानाधारित अध्यापन कार्यशाळा
चिपळूण (प्रतिनिधी) : चिपळूण तालुक्यात हिंदी दिवस व हिंदी पंधरवडा २०२६ विविध उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्याच्या नियोजनासाठी चिपळूण तालुका हिंदी शिक्षक कार्यकारिणी मंडळाची बैठक इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र, चिपळूण येथे नुकतीच पार पडली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मंडळाच्या अध्यक्षा सौ. मानसी पेढांबकर होत्या.
हिंदी भाषेचे संवर्धन, विद्यार्थ्यांमध्ये भाषेविषयी जागरूकता निर्माण करणे तसेच शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या कलागुणांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने दरवर्षी हिंदी पंधरवडा विविध उपक्रमांनी साजरा केला जातो. यंदाच्या पंधरवडा समारोप सोहळ्याचे नियोजन, विविध स्पर्धांचे आयोजन आणि प्रशासकीय बाबींवर बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली.
बैठकीत झालेल्या निर्णयानुसार हिंदी पंधरवडा समारोप समारंभ २४ सप्टेंबर २०२६ रोजी युनायटेड इंग्लिश स्कूलच्या गुरुदक्षिणा सभागृहात आयोजित करण्यात येणार आहे. तालुक्यातील विविध शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी घेण्यात आलेल्या हिंदी विषयक स्पर्धांतील विजेत्यांचा यावेळी गौरव करण्यात येणार असून, उत्कृष्ट कामगिरी करणारे शिक्षक आणि शाळांचाही सन्मान करण्यात येणार आहे.
समारंभाच्या रूपरेषेबाबत चर्चा करताना मान्यवरांचा सत्कार, शिक्षकांचा गौरव, विद्यार्थ्यांचा सन्मान तसेच शैक्षणिक क्षेत्रातील नव्या संकल्पनांवर आधारित उपक्रम राबविण्याचे निश्चित करण्यात आले. ‘प्रभावी अध्यापन पद्धतीमध्ये तंत्रज्ञानाचा उपयोग’ या विषयावर शिक्षकांसाठी मार्गदर्शनपर कार्यशाळा घेण्याचा निर्णयही बैठकीत घेण्यात आला. आधुनिक तंत्रज्ञानाचा अध्यापनात प्रभावी वापर करण्यासाठी या कार्यशाळेत शिक्षकांना मार्गदर्शन मिळणार आहे.
कार्यक्रमाचे नियोजन सुरळीत व्हावे यासाठी बैठक व्यवस्था, स्वागत समिती, सूत्रसंचालन, आभार प्रदर्शन, सत्कार व सन्मान सोहळा, भोजन व चहा-पाण्याची व्यवस्था, प्रमाणपत्रांची छपाई, ट्रॉफी, शील्ड व सन्मानचिन्हांची उपलब्धता तसेच साहित्य व्यवस्थापन आदी जबाबदाऱ्या कार्यकारिणी सदस्यांमध्ये विभागून देण्यात आल्या.
अध्यक्षा सौ. मानसी पेढांबकर यांनी मार्गदर्शन करताना हिंदी पंधरवडा हा केवळ औपचारिक कार्यक्रम न राहता विद्यार्थ्यांच्या भाषिक कौशल्यांच्या विकासाचे प्रभावी माध्यम ठरावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व पदाधिकारी, शिक्षक आणि सदस्यांनी समन्वयाने काम करण्याचे आवाहन त्यांनी केले.
सौ. मुग्धा पवार यांनी हिंदी भाषा आणि राष्ट्रभाषेच्या सन्मानासाठी सर्व हिंदी शिक्षकांनी राष्ट्रीय भावनेतून कार्य करावे, असे प्रतिपादन केले. हिंदीच्या प्रसारासाठी शाळास्तरावर अधिकाधिक उपक्रम राबविण्याची गरज असल्याचेही त्यांनी सांगितले.
बैठकीस अध्यक्षा सौ. मानसी पेढांबकर, सचिव श्री. निलेश नागे, कार्यकारिणी सदस्य श्री. शक्तीकुमार चव्हाण, श्री. मोहन पवार, श्री. परवेज पीरजादे, सौ. उज्ज्वला लोखंडे, सौ. मुग्धा पवार, सौ. राखी भुरण तसेच श्री. राजेश माळी उपस्थित होते.
बैठकीच्या शेवटी आगामी हिंदी पंधरवडा समारोप सोहळा भव्य, शिस्तबद्ध आणि संस्मरणीय करण्याचा निर्धार उपस्थित सदस्यांनी व्यक्त केला.




