
सात वर्षांपासून नुकसानभरपाईच्या प्रतीक्षेत ८० वर्षीय महिला शेतकरी
महामार्गाच्या भरावामुळे शेती-बागायतीचे नुकसान; भावाने प्रांताधिकाऱ्यांकडे मांडली व्यथा
राजापूर : सन २०१९ मध्ये मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणादरम्यान झालेल्या नैसर्गिक आपत्तीत नुकसान होऊनही गेल्या सात वर्षांपासून नुकसानभरपाई न मिळाल्याने तालुक्यातील ८० वर्षीय महिला शेतकरी न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत. त्यांच्या वतीने त्यांचे ७८ वर्षीय भाऊ व मुखत्यार डॉ. महेंद्र मोहन गुजर यांनी ४ सप्टेंबर रोजी प्रांताधिकारी कार्यालयात निवेदन देऊन नुकसानभरपाईची मागणी केली.
खरवते चाऱ्याचा पऱ्या येथे महामार्गाच्या कामासाठी सुमारे १० ते १५ मीटर उंचीचा भराव टाकण्यात आला होता. तसेच मोरीमध्ये अडथळा निर्माण झाल्याने पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात साचून धरणसदृश्य परिस्थिती निर्माण झाली. त्यामुळे परिसरातील भातशेती व बागायती पाण्याखाली गेल्या. यामध्ये गुजर यांच्या बहिणी खेलना ठीगळे यांच्या मालकीच्या आंबा, काजू, नारळ व सागाच्या झाडांचे मोठे नुकसान झाले.
पाणी साचल्यानंतर महामार्ग विभाग व ठेकेदाराकडून पंपांच्या सहाय्याने पाणी काढण्याचे प्रयत्न करण्यात आले. मात्र निचरा न झाल्याने यंत्रसामग्रीच्या सहाय्याने मोरीतील अडथळे दूर करण्यात आले. तत्कालीन आमदार राजन साळवी यांनीही घटनास्थळी भेट देऊन अडथळा तातडीने दूर करण्याच्या सूचना केल्या होत्या.
मात्र, सात वर्षे सातत्याने पाठपुरावा करूनही नुकसानभरपाई मिळालेली नाही. संबंधित कंपनीशी संपर्क करूनही दाद मिळत नसल्याने महसूल प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत असल्याची खंत डॉ. गुजर यांनी व्यक्त केली असून, वृद्ध महिला शेतकऱ्याला तातडीने न्याय देऊन नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणी केली आहे.




