
चिपळूण पंचायत समितीचे स्थलांतर नको; विद्यमान ठिकाणीच बहुमजली इमारत उभारा
चिपळूण : चिपळूण पंचायत समितीचे कार्यालय बहादूरशेख नाका येथे स्थलांतरित करण्याबाबत झालेल्या ठरावाचा पुनर्विचार करून तो रद्द करावा आणि विद्यमान ठिकाणीच बहुमजली, सुसज्ज व प्रशस्त प्रशासकीय इमारत उभारावी, अशी मागणी जिल्हा परिषद सदस्या तथा स्थायी समिती सदस्या शिवानी संदीप सावंत यांनी केली आहे. याबाबत त्यांनी पंचायत समितीचे सभापती, उपसभापती आणि गटविकास अधिकारी यांना पत्र देऊन ग्रामीण जनतेच्या सोयीचा विचार करण्याची विनंती केली आहे.
चिपळूण शहराच्या मध्यवर्ती भागात असलेले पंचायत समितीचे विद्यमान कार्यालय हे वहाळ, मालदोली, रामपूर, सावर्डे, कोकरे यांसह संपूर्ण तालुक्यातील ग्रामीण जनतेसाठी महत्त्वाचे प्रशासकीय केंद्र आहे. ग्रामीण भागातून विविध शासकीय कामांसाठी चिपळूणमध्ये येणाऱ्या नागरिकांना बसस्थानकापासून काही मिनिटांच्या अंतरावर पंचायत समितीचे कार्यालय उपलब्ध होत असल्याने हे ठिकाण शेतकरी, महिला, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग आणि सर्वसामान्य नागरिकांसाठी सोयीचे आहे.
एकाच परिसरात अनेक शासकीय कार्यालये
विशेष म्हणजे विद्यमान पंचायत समिती कार्यालयाच्या परिसरात तहसील कार्यालय, सेतू कार्यालय, न्यायालय, चिपळूण पोलीस ठाणे, प्रांत कार्यालय, भूमिअभिलेख कार्यालय तसेच राष्ट्रीय महामार्गाशी संबंधित कार्यालये आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातून आलेल्या नागरिकांना एकाच परिसरात विविध शासकीय कामे पूर्ण करता येतात.
पंचायत समितीचे कार्यालय बहादूरशेख नाका येथे स्थलांतरित झाल्यास नागरिकांना विविध कार्यालयांमध्ये ये-जा करण्यासाठी अतिरिक्त अंतर कापावे लागेल. त्यामुळे प्रवासाचा वेळ आणि वाहनखर्च वाढून ग्रामीण जनतेवर आर्थिक भार पडण्याची शक्यता असल्याचे सावंत यांनी पत्रात नमूद केले आहे.
जुन्या इमारतीच्या जागीच आधुनिक वास्तू उभारण्याची मागणी
पंचायत समितीची विद्यमान इमारत जीर्ण झाल्याने नवीन इमारतीची गरज आहे, हे मान्य करतानाच त्यासाठी स्थलांतर हाच एकमेव पर्याय नसावा, अशी भूमिका शिवानी सावंत यांनी मांडली आहे. विद्यमान जागेवरील जुन्या इमारतींचे नियोजनबद्ध पुनर्बांधकाम करून त्याच ठिकाणी बहुमजली व आधुनिक प्रशासकीय वास्तू उभारल्यास पंचायत समितीचे सर्व विभाग एकाच छताखाली आणता येतील आणि नागरिकांची सध्याची सोयही कायम राहील, असे त्यांनी म्हटले आहे.
ग्रामीण जनतेचा वेळ, प्रवासाचा खर्च आणि प्रशासकीय सोय लक्षात घेऊन पंचायत समितीच्या भविष्यातील प्रशासकीय व्यवस्थेचे नियोजन करणे आवश्यक आहे. त्यामुळे बहादूरशेख नाका येथे स्थलांतराचा ठराव रद्द करून विद्यमान ठिकाणीच बहुमजली, सुसज्ज आणि प्रशस्त प्रशासकीय इमारत उभारावी, अशी ठाम मागणी शिवानी सावंत यांनी केली आहे.




