विशेष पोलीस महानिरीक्षक मिना यांनीगणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर राजापूर पोलीस स्थानकाला आकस्मिक भेट; धुतपापेश्वर मंदिराच्या सुरक्षेचीही केली पाहणी


राजापूर : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकणातील वाढती वाहतूक आणि संभाव्य गर्दी लक्षात घेता महामार्गावरील सुरक्षा व्यवस्था अधिक सक्षम करण्याच्या सूचना राज्याचे विशेष पोलीस महानिरीक्षक चंद्रकिशोर मिना यांनी राजापूर पोलिसांना दिल्या. मंगळवारी राजापूर दौऱ्यावर आलेल्या मिना यांनी श्री देव धुतपापेश्वर मंदिराला भेट देत मंदिराच्या सुरक्षेची पाहणी केली. त्यानंतर राजापूर पोलीस स्थानकाला आकस्मिक भेट देऊन गणेशोत्सवाच्या अनुषंगाने करण्यात आलेल्या पोलीस बंदोबस्त व वाहतूक नियोजनाचा आढावा घेतला.
विशेष पोलीस महानिरीक्षक चंद्रकिशोर मिना हे मंगळवारपासून कोकण दौऱ्यावर असून, या दौऱ्यादरम्यान त्यांनी राजापूर व लांजा तालुक्यांना भेट दिली. राजापूर येथे उपविभागीय पोलीस अधिकारी सुरेश कदम यांनी त्यांचे स्वागत केले.
मिना यांनी सर्वप्रथम राजापूरचे आराध्यदैवत श्री देव धुतपापेश्वर मंदिराला भेट देऊन दर्शन घेतले. यावेळी मंदिर परिसरातील सुरक्षा व्यवस्थेची पाहणी करून मंदिराच्या सुरक्षिततेसाठी करण्यात आलेल्या उपाययोजनांची माहिती घेतली. गणेशोत्सवाच्या काळात मंदिर तसेच प्रमुख धार्मिक स्थळांवर गर्दी वाढण्याची शक्यता असल्याने सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक ती खबरदारी घेण्याच्या सूचना त्यांनी केल्या.
यानंतर मिना यांनी राजापूर पोलीस स्थानकाला आकस्मिक भेट दिली. पोलीस स्थानकातील विविध कामकाजाची पाहणी करत त्यांनी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी केलेल्या नियोजनाचा आढावा घेतला. महामार्गावरील वाहतूक व्यवस्था, गर्दीची संभाव्य ठिकाणे, अपघातप्रवण क्षेत्रे तसेच गणेशोत्सव काळात निर्माण होणाऱ्या वाहतूक समस्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी करण्यात आलेल्या उपाययोजनांची माहिती त्यांनी घेतली.
महामार्गावर वाहनांची वाढती वर्दळ लक्षात घेऊन वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी तसेच प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. महामार्गावर पोलिसांच्या वतीने उभारण्यात येणाऱ्या सुरक्षा चौक्या व पॅन्डॉल अद्याप उभारण्यात आले नसल्याचे निदर्शनास आल्याने मिना यांनी नाराजी व्यक्त केली. गणेशोत्सव सुरू होण्यापूर्वी सुरक्षा व्यवस्थेतील आवश्यक बाबी पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले.
यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे, सिंधुदुर्गचे पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहीकर यांच्यासह पोलीस अधिकारी उपस्थित होते. राजापूर दौऱ्यानंतर मिना यांनी लांजा पोलीस स्थानकालाही भेट देऊन तेथील कामकाजाचा आढावा घेतला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button