बिजघर नं. १ शाळेत रानभाज्यांचा जागर

विद्यार्थ्यांनी साकारलेल्या वैविध्यपूर्ण प्रदर्शनातून पारंपरिक आहाराची ओळख; रानभाज्यांच्या पौष्टिकतेचे धडे

खेड : सध्याच्या फास्ट फूडच्या वाढत्या प्रभावामुळे पारंपरिक आणि नैसर्गिक आहारापासून दूर जात असलेल्या नव्या पिढीला आपल्या मातीत, जंगलात आणि माळरानावर नैसर्गिकरीत्या उगवणाऱ्या रानभाज्यांची ओळख व्हावी, तसेच त्यांच्या पौष्टिक व औषधी गुणधर्मांची माहिती मिळावी, या उद्देशाने जिल्हा परिषद शाळा बिजघर नं. १ येथे ‘रानभाज्या महोत्सव’ उत्साहात आयोजित करण्यात आला. विद्यार्थी, शिक्षक, पालक आणि ग्रामस्थांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे महोत्सवाला आगळेवेगळे स्वरूप प्राप्त झाले.
या महोत्सवात विद्यार्थ्यांनी पालकांच्या सहकार्याने परिसरातील जंगल, माळरान आणि शेतशिवारातून विविध रानभाज्या संकलित केल्या. टाकळा, कुर्डू, फोडशी, कर्टोली, भारंगी, आघाडा, गुळवेल आदी रानभाज्यांचे आकर्षक प्रदर्शन विद्यार्थ्यांनी मांडले.
विशेष म्हणजे, केवळ रानभाज्या प्रदर्शनात ठेवण्याऐवजी विद्यार्थ्यांनी प्रत्येक भाजीचे स्थानिक नाव, तिचे उपयोग, औषधी गुणधर्म आणि आरोग्यदायी महत्त्व याची माहिती देणारे तक्ते स्वतः तयार केले होते. त्यामुळे महोत्सव हे केवळ प्रदर्शन न राहता विद्यार्थ्यांसाठी प्रत्यक्ष अनुभवातून शिकण्याचे प्रभावी माध्यम ठरले.
महोत्सवाचे आणखी एक प्रमुख आकर्षण म्हणजे विविध रानभाज्यांपासून तयार करण्यात आलेले पारंपरिक पदार्थ. ग्रामस्थ आणि शिक्षकांच्या सहकार्याने तयार केलेल्या रानभाज्यांच्या चविष्ट पाककृतींचा उपस्थितांनी आस्वाद घेतला. यामुळे विद्यार्थ्यांना आपल्या पारंपरिक खाद्यसंस्कृतीची ओळख झाली, तर पालक आणि ग्रामस्थांनाही जुन्या खाद्यपरंपरांना उजाळा देण्याची संधी मिळाली.
यावेळी शिक्षकांनी रानभाज्यांचे आहारातील महत्त्व, त्यांचे पारंपरिक उपयोग आणि पावसाळ्यात नैसर्गिकरीत्या उपलब्ध होणाऱ्या विविध वनस्पतींबाबत विद्यार्थ्यांना माहिती दिली. मात्र, रानभाज्या ओळखून आणि तज्ज्ञांच्या मार्गदर्शनानुसारच सेवन करणे आवश्यक आहे, याबाबतही मार्गदर्शन करण्यात आले.
या कार्यक्रमाला बिजघर गावच्या माजी सरपंच शुभांगी भोसले, शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा आकांक्षा जंगम, सामाजिक कार्यकर्ते शुभम गायकवाड, कमलेश भोसले, आस्मी भोसले, आशा सेविका सायली शिगण, तसेच संगीता घडशी, अर्पणा कदम, सपना कदम, मनीषा खोपकर, कीर्ती मोहिते, योगिता निकम आदी उपस्थित होते.
उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांनी केलेल्या रानभाज्यांच्या प्रदर्शनाचे कौतुक करून अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांना निसर्ग, स्थानिक जैवविविधता, पारंपरिक खाद्यसंस्कृती आणि आरोग्यदायी आहार यांचे महत्त्व समजण्यास मदत होते, असे मत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शैलेश पराडकर यांनी केले, तर संदीप घाणेकर यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापिका भाग्यश्री काणेकर, शैलेश पराडकर, विजय सकपाळ आणि संदीप घाणेकर यांनी विशेष मेहनत घेतली.
पारंपरिक आहाराची ओळख, निसर्गाशी नाते आणि विद्यार्थ्यांच्या प्रत्यक्ष सहभागातून शिक्षण असा त्रिवेणी संगम घडवून आणणारा बिजघर नं. १ शाळेचा रानभाज्या महोत्सव विद्यार्थ्यांसह पालक आणि ग्रामस्थांसाठीही ज्ञानवर्धक व संस्मरणीय ठरला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button