
पिरलोटे-सोनगाव रस्त्यावरील खड्डे दोन दिवसांत बुजवणार!
शिवसेना (उबाठा)च्या निवेदनानंतर एमआयडीसी प्रशासनाचे आश्वासन; गणेशोत्सवापूर्वी रस्ता वाहतुकीस योग्य करण्याचा निर्णय
खेड : पिरलोटे ते घरडा कॉलनी आणि सोनगावकडे जाणाऱ्या रस्त्यावर पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यांमुळे वाहनचालक आणि ग्रामस्थांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. पावसामुळे रस्त्याची अवस्था आणखी बिकट झाली असून, गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर या मार्गावर वाढणारी वाहतूक लक्षात घेता अपघाताचा धोका निर्माण झाला आहे.
या गंभीर समस्येची दखल घेत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने मंगळवारी एमआयडीसी, खेर्डी येथील कार्यालयात लेखी निवेदन देण्यात आले. धामणदेवी पंचायत समिती सदस्या सौ. रेवती राजेंद्र घाग यांच्या पुढाकाराने हे निवेदन एमआयडीसीचे उपअभियंता श्री. हळदणकर यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले.
गणेशोत्सव काही दिवसांवर येऊन ठेपला असून, या काळात मुंबई, पुणे तसेच विविध भागांतून मोठ्या संख्येने नागरिक व गणेशभक्त या मार्गावरून प्रवास करतात. त्यामुळे सध्याची रस्त्याची दुरवस्था लक्षात घेता गणेशोत्सवापूर्वी तात्पुरत्या स्वरूपात खड्डे बुजवावेत, अशी आग्रही मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.
तसेच पावसाळा संपल्यानंतर केवळ खड्डे बुजविण्यापुरती मर्यादित उपाययोजना न करता रस्त्याचे कायमस्वरूपी मजबुतीकरण व आवश्यक डांबरीकरण करण्यात यावे, अशी मागणीही करण्यात आली.
निवेदनातील मागणी आणि रस्त्याच्या समस्येचे गांभीर्य लक्षात घेऊन एमआयडीसीचे उपअभियंता श्री. हळदणकर यांनी येत्या दोन दिवसांत रस्त्यावरील खड्डे बुजवून तो वाहतुकीस योग्य करण्यात येईल, असे ठोस आश्वासन दिले.
गणेशोत्सवाच्या काळात नागरिकांना सुरक्षित प्रवास करता यावा आणि वाहतुकीची गैरसोय होऊ नये, यासाठी प्रशासनाने तातडीने कार्यवाही करावी, अशी अपेक्षा स्थानिक ग्रामस्थांकडून व्यक्त करण्यात आली आहे.
यावेळी धामणदेवी पंचायत समिती सदस्या सौ. रेवती घाग, विभागप्रमुख श्री. राजेंद्र घाग, उपतालुकाप्रमुख श्री. विजय साळुंखे, सोनगाव उपसरपंच श्री. मिलिंद घोरपडे, शाखाप्रमुख श्री. दीपक घाग, श्री. प्रथमेश घाग, श्री. दत्ताराम घाग आणि श्री. अमोल चाळके यांच्यासह शिवसेना (उबाठा)चे पदाधिकारी व स्थानिक ग्रामस्थ उपस्थित होते.
एमआयडीसी प्रशासनाने दिलेले आश्वासन प्रत्यक्षात कितपत उतरते, याकडे आता पिरलोटे, घरडा कॉलनी आणि सोनगाव परिसरातील ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.




