
सैनिक-माजी सैनिकांच्या सुविधांसाठी रत्नागिरी, चिपळूणमधील प्रकल्प प्राधान्याने मार्गी लावणार— मंत्री शंभूराज देसाई
*मुंबई, *: सैनिक आणि माजी सैनिकांनी देशसेवेसाठी दिलेल्या योगदानाची जाणीव ठेवून त्यांच्या कल्याणासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देणे ही शासनाची जबाबदारी आहे. रत्नागिरी येथील सैनिक विश्रामगृह आणि चिपळूण येथील सैनिक व माजी सैनिकांच्या पाल्यांसाठी प्रस्तावित वसतीगृहाचे काम प्राधान्याने मार्गी लावण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही तातडीने करण्यात येईल, असे माजी सैनिक कल्याण मंत्री शंभूराज देसाई यांनी सांगितले.
मुंबईतील मेघदूत या शासकीय निवासस्थानी रत्नागिरी येथे सैनिक विश्रामगृह उभारणे तसेच चिपळूण, जि. रत्नागिरी येथे सैनिक व माजी सैनिकांसाठी वसतीगृह निर्माण करण्यासंदर्भात मंत्री शंभूराज देसाई यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली.
यावेळी राज्याचे उद्योगमंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत आणि आमदार शेखर निकम उपस्थित होते. तसेच माजी सैनिक कल्याण विभागाचे अधिकारी आणि संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
या प्रकल्पांसाठी आवश्यक असलेल्या अतिरिक्त निधीची उपलब्धता करून देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत आणि माजी सैनिक कल्याण मंत्री शंभूराज देसाई संयुक्त पत्राद्वारे मागणी करणार आहेत. आवश्यक निधी उपलब्ध करून घेण्यासाठी शासन स्तरावर पाठपुरावा करण्यात येणार असल्याचेही बैठकीत स्पष्ट करण्यात आले.
या बैठकीत रत्नागिरी येथे सैनिक विश्रामगृह तसेच चिपळूण येथे सैनिक व माजी सैनिकांसाठी वसतीगृह उभारण्याच्या प्रस्तावावर सविस्तर चर्चा करण्यात आली. सैनिक आणि माजी सैनिकांना आवश्यक निवास सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेल्या या दोन्ही प्रकल्पांना तत्त्वतः मंजुरी देण्यात आली.
हे प्रकल्प प्राधान्याने सन २०२६-२७ या आर्थिक वर्षात समाविष्ट करून त्यासाठी आवश्यक प्रशासकीय कार्यवाही तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना मंत्री श्री. देसाई यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
रत्नागिरी येथे प्रस्तावित सैनिक विश्रामगृहामुळे जिल्ह्यात येणाऱ्या सैनिक तसेच माजी सैनिकांना निवासाची सुविधा उपलब्ध होणार आहे. चिपळूण येथे प्रस्तावित वसतीगृहामुळे सैनिक व माजी सैनिकांसाठी सुरक्षित आणि आवश्यक निवासव्यवस्था उपलब्ध होण्यास मदत होणार आहे. या दोन्ही प्रकल्पांमुळे सैनिक व माजी सैनिकांच्या सुविधा अधिक सक्षम होणार असून त्यांच्या कल्याणासाठी शासनाच्या प्रयत्नांना बळ मिळणार आहे.
सैनिक आणि माजी सैनिकांच्या सुविधांसाठी आवश्यक असलेली ही दोन्ही कामे प्राधान्याने आणि वेळेत मार्गी लावण्यासाठी माझा ठाम प्रयत्न राहील, असा विश्वास मंत्री श्री. देसाई यांनी व्यक्त केला.




