
कोंडेतड–चिंचबाध पूल मार्गाच्या काँक्रीटीकरणाला वेग; अनेक वर्षांच्या प्रतीक्षेतील रस्ता ५० टक्के पूर्णत्वाकडे
राजापूर : मुंबई-गोवा महामार्गावरील कोंडेतड येथून चिंचबाध पुलामार्गे राजापूर शहराकडे जाणाऱ्या महत्त्वपूर्ण रस्त्याच्या सिमेंट काँक्रिटीकरणाच्या कामाला वेग आला असून, गेली अनेक वर्षे रखडलेल्या या रस्त्याचे सुमारे ५० टक्के काम पूर्णत्वाकडे जात आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.
या महत्त्वपूर्ण रस्त्याच्या कामासाठी आमदार किरण उर्फ भैया सामंत यांचे महत्त्वपूर्ण योगदान लाभले आहे. तसेच नगराध्यक्ष हुस्नबानू खलिफे, नगरसेवक जमीर खलिफे, नगरपरिषद प्रशासन यांच्याही सहकार्यामुळे या कामाला गती मिळाल्याबद्दल नागरिकांकडून त्यांचे आभार व्यक्त करण्यात आले आहेत.
रस्त्याचे काम दर्जेदार पद्धतीने करण्यात येत असून, कामाची गुणवत्ता राखण्यासाठी प्रयत्न करणारे ठेकेदार अनुप गुणिजन यांचेही विशेष आभार व्यक्त करण्यात आले आहेत.
दरम्यान, या रस्त्याच्या कामासाठी गेल्या सहा महिन्यांपासून सातत्याने पाठपुरावा करणाऱ्या स्थानिक नगरसेविका साजिया काझी, सौरभ पेंणकर तसेच मुजाहिद काझी यांनीही रस्ता लवकरात लवकर पूर्ण व्हावा यासाठी विशेष प्रयत्न केले. त्यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे या कामाला चालना मिळाल्याची भावना स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून या रस्त्याच्या दुरुस्ती व काँक्रीटीकरणाची प्रतीक्षा नागरिकांना होती. सध्या रस्त्याचे किमान ५० टक्के काम पूर्णत्वाकडे जात असून, उर्वरित ५० टक्के कामही लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावे, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.
या रस्त्यासाठी योगदान देणारे लोकप्रतिनिधी, नगरपरिषद प्रशासन, संबंधित अधिकारी आणि ठेकेदार यांनी उर्वरित कामालाही प्राधान्य देऊन हा संपूर्ण मार्ग लवकरात लवकर नागरिकांच्या सेवेत उपलब्ध करून द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.




