
भक्ती बर्वे इनामदार करंडकाच्या अंतिम फेरीत ‘तू पालनहारी’
रत्नागिरीच्या स्टार थिएटरची राज्यस्तरीय नाट्यस्पर्धेत दमदार कामगिरी; ३३ नाटकांतून अंतिम नऊमध्ये निवड

रत्नागिरी : पुणे येथे संपन्न होणाऱ्या राज्यस्तरीय भक्ती बर्वे इनामदार करंडक नाट्यस्पर्धेच्या अंतिम फेरीसाठी रत्नागिरीच्या स्टार थिएटर रत्नागिरी निर्मित ‘तू पालनहारी’ या दोन अंकी नाटकाची निवड झाली आहे. महाराष्ट्रभरातून प्राथमिक फेरीत सहभागी झालेल्या ३३ नाटकांमधून अंतिम फेरीसाठी निवड झालेल्या नऊ नाटकांमध्ये ‘तू पालनहारी’ने स्थान मिळविल्याने रत्नागिरीच्या रंगभूमीच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे.
पुणे येथील स्पेशल फोर्टी फेसबुक ग्रुप आणि ऑल इंडिया सिने वर्कर्स असोसिएशन यांच्या वतीने भक्ती बर्वे इनामदार करंडक ही राज्यस्तरीय नाट्यस्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेच्या प्राथमिक फेरीत महाराष्ट्रातील एकूण ३३ संघांनी सहभाग नोंदविला होता. प्राथमिक फेरी रेकॉर्डिंगच्या माध्यमातून पार पडली. या ३३ नाटकांमधून अंतिम फेरीसाठी नऊ नाटकांची निवड करण्यात आली असून त्यामध्ये स्टार थिएटर रत्नागिरीच्या ‘तू पालनहारी’ या नाटकाचा समावेश आहे.
अमेय धोपटकर लिखित आणि आप्पा रणभिसे दिग्दर्शित या नाटकाचे वैशिष्ट्य म्हणजे नाटकात एकूण ४४ भूमिका असून या सर्व भूमिका केवळ दोन कलाकार साकारतात. विलास जाधव आणि समीर इंदुलकर हे दोन कलाकार या ४४ विविध भूमिका सादर करीत आहेत.
या नाटकाचे नेपथ्यही विशेष लक्षवेधी ठरले आहे. पूर्णपणे मोकळ्या रंगमंचावर केवळ शॅडो प्लेच्या माध्यमातून मुंबईतील विविध स्थळे साकारण्यात आली आहेत. नेपथ्यकार विनायक आपकरे आणि आकाश रणभिसे यांनी ही कल्पक मांडणी केली आहे.
नाटकाचे पार्श्वसंगीत विशाल नाटेकर आणि संतोष सनगरे यांनी दिले असून ध्वनीसंयोजन ज्येष्ठ रंगकर्मी चंद्रकांत आंबेरकर यांचे आहे. शॅडो प्लेच्या नेपथ्याला साजेशी प्रकाशयोजना सुप्रसिद्ध प्रकाश योजनाकार अनिकेत गानू यांनी केली आहे. विविध ४४ भूमिका साकारण्यासाठी आवश्यक असलेली वेशभूषा ज्येष्ठ रंगकर्मी विजय पोकळे यांची असून रंगभूषेची जबाबदारी निवराज मणचेकर यांनी सांभाळली आहे. संपूर्ण नाटकाची रंगमंच व्यवस्था अभिजीत डोंगरे यांनी केली आहे.
पुणे येथे होणाऱ्या अंतिम फेरीसाठी ‘तू पालनहारी’ या नाटकाची निवड होणे हे रत्नागिरी आणि कोकणासाठी अत्यंत अभिमानास्पद असल्याचे नाटकाचे सूत्रधार व स्टार थिएटरचे खजिनदार संजय कांबळे यांनी सांगितले.
दरम्यान, अंतिम फेरीसाठी निवड झाल्याबद्दल स्टार थिएटरचे सदस्य तथा सुप्रसिद्ध अभिनेते मनोज कोल्हटकर आणि वैभव मांगले यांनी नाटकाच्या संपूर्ण टीमचे अभिनंदन करून पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.




