
प्रीती झिंटाही ‘टीम तुकाराम मुंढे’मध्ये; टी-शर्टवरील संदेशाने वेधले सर्वांचे लक्ष
“आता या खऱ्या हिरोंना सेलिब्रेट करण्याची वेळ आली आहे,” अभिनेत्रीचा संदेश
मुंबई : महाराष्ट्राच्या अन्न व औषध प्रशासनाचे (एफडीए) आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या धडक कारवाईची चर्चा सध्या सर्वत्र सुरू असतानाच अभिनेत्री प्रीती झिंटानेही त्यांना अनोख्या पद्धतीने पाठिंबा दर्शविला आहे. प्रीतीने ‘टीम तुकाराम मुंढे’ असा संदेश असलेला टी-शर्ट परिधान केल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
अन्न भेसळीविरोधात गेल्या काही महिन्यांपासून एफडीएकडून कारवाई तीव्र करण्यात आली आहे. छोट्या खाद्यपदार्थांच्या स्टॉल्सपासून पंचतारांकित हॉटेल्स, आंतरराष्ट्रीय फूड चेन तसेच जुन्या व नामांकित आस्थापनांपर्यंत तपासणी आणि कारवाईचा धडाका सुरू असल्याने तुकाराम मुंढे पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहेत.
त्यांच्या या कार्यशैलीचे सामान्य नागरिकांसह अनेक नामांकित व्यक्ती आणि कलाकारांकडूनही कौतुक होत आहे. अभिनेता मनोज बाजपेयी यांच्यासह देसी शाह, रवीना टंडन, सलमान खान, परेश रावल आणि ट्विंकल खन्ना यांनीही मुंढे यांच्या कामाबद्दल सकारात्मक प्रतिक्रिया व्यक्त केल्याची चर्चा आहे.
आता या यादीत अभिनेत्री प्रीती झिंटाचाही समावेश झाला आहे. कपील कारंडे यांच्या सोशल मीडिया अकाउंटवरून शेअर करण्यात आलेल्या एका व्हिडीओमध्ये प्रीती पापाराझींना फोटोसाठी पोझ देताना दिसत आहे. निळ्या रंगाची जिन्स आणि काळ्या टी-शर्टमधील तिचा साधा पण आकर्षक लूक चर्चेचा विषय ठरला.
मात्र, तिच्या टी-शर्टवरील ‘टीम तुकाराम मुंढे’ या शब्दांनी सर्वाधिक लक्ष वेधून घेतले. पापाराझींनी टी-शर्टवरील हा संदेश मोठ्याने वाचल्यानंतर प्रीतीनेही त्यावर प्रतिक्रिया देताना, “आता या हिरोंना सेलिब्रेट करण्याची वेळ आली आहे,” असा संदेश दिला.
एका अभिनेत्रीने थेट आपल्या टी-शर्टद्वारे तुकाराम मुंढे यांच्या कारवाईला पाठिंबा दिल्याने हा व्हिडीओ आता सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चिला जात आहे.




