
प्रशासनाच्या आदेशामुळे आंबा घाटात एसटी बस अडवल्याने प्रवाशांचे हाल; रात्रीच्या नियमामुळे अडीच तास ताटकळत बसण्याची वेळ
कोल्हापुरातून उशिरा निघालेल्या लातूर–देवरूख बसला पोलिसांचा पुढे जाण्यास नकार; लहान मुले, महिला व ज्येष्ठ नागरिकांची गैरसोय
कोल्हापुरातून उशिरा निघाल्यामुळे लातूरहून देवरूखकडे जाणारी एसटी बस शुक्रवारी रात्री सुमारे आठ वाजता आंबा घाटात पोहोचली. मात्र, घाटातील वाहतुकीसाठी निर्धारित वेळ संपल्याचे कारण देत आंबा पोलिसांनी बसला पुढे जाण्यास मज्जाव केला. त्यामुळे ऐन रात्री प्रवाशांची मोठी तारांबळ उडाली.
सुरक्षेच्या कारणास्तव आंबा घाटातून एसटी बस वाहतुकीसाठी सकाळी ७ ते सायंकाळी ७ अशी वेळ प्रशासनाने निश्चित केली आहे. शुक्रवारी संबंधित बस कोल्हापुरातून उशिरा निघाल्याने ती निर्धारित वेळेपेक्षा उशिरा, रात्री आठच्या सुमारास घाटाच्या तोंडाशी पोहोचली. मात्र, वेळेचा नियम पुढे करत पोलिसांनी बसला पुढील प्रवासाची परवानगी नाकारली.
यामुळे बसमधील लहान मुले, महिला, ज्येष्ठ नागरिकांसह सर्वच प्रवाशांना रात्रीच्या वेळी घाटाच्या तोंडावर तब्बल अडीच तास ताटकळत राहावे लागले. आधीच वाहतूक कोंडीमुळे बसला उशीर झाला असताना, अपवादात्मक परिस्थितीचा विचार करून प्रशासनाने काहीशी लवचिक भूमिका घ्यायला हवी होती, अशी संतप्त प्रतिक्रिया प्रवाशांनी व्यक्त केली.
अखेर अडीच तासांच्या प्रतीक्षेनंतर रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास पोलिसांनी बसला पुढे जाण्याची परवानगी दिली. त्यानंतर ही बस देवरूखच्या दिशेने रवाना झाली. प्रशासकीय नियमांचे पालन आवश्यक असले तरी अनपेक्षित विलंबामुळे अडकलेल्या प्रवाशांचा विचार करून अशा परिस्थितीत पर्यायी निर्णय घेण्याची गरज असल्याची चर्चा यानिमित्ताने सुरू झाली आहे.




