
गणेशोत्सव मंडळांनो, ‘डीजे’मुक्त उत्सवाचा आदर्श ठेवा! : जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे
रत्नागिरी:
रत्नागिरी जिल्ह्यातील आणि शहरातील सार्वजनिक तसेच खासगी गणेशोत्सव मंडळांनी यंदाचा गणेशोत्सव अत्यंत शिस्तबद्ध आणि पारंपरिक पद्धतीने साजरा करावा. गणेशमूर्तीचे आगमन असो वा विसर्जन, डीजेचा वापर टाळून ‘डीजे’मुक्त गणेशोत्सवाचा एक उत्तम आदर्श निर्माण करावा, असे स्पष्ट आवाहन जिल्हा पोलिस अधीक्षक नितीन बगाटे यांनी केले आहे. पोलिस मुख्यालयाच्या सभागृहात पार पडलेल्या गणेशोत्सव मंडळे आणि पत्रकारांच्या संयुक्त बैठकीत ते बोलत होते.
बैठकीदरम्यान बोलताना पोलिस अधीक्षक बगाटे यांनी स्पष्ट केले की, शहरात अनेक ठिकाणी रस्ते अरुंद आहेत, त्यामुळे सर्व मंडळांनी आपल्या मिरवणुका शिस्तबद्ध रीतीने काढाव्यात. डीजे ही आपली संस्कृती नाही. डीजेच्या प्रचंड आवाजामुळे लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि सामान्य नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे सर्वांनी पारंपरिक ढोल-ताशांच्या गजरात आणि उत्साहात गणेशोत्सव साजरा करावा. गणेशोत्सवा दरम्यान प्रत्येक मंडळाला ध्वनिक्षेपकाच्या (स्पीकर) आवाजाबाबत डेसिबलची मर्यादा पूर्वकल्पना देऊन कळवली जाईल आणि या मर्यादेचे तंतोतंत पालन करणे बंधनकारक राहील. विसर्जन मिरवणुकीच्या वेळी पोलिस पथकांकडून डेसिबलची तपासणी केली जाईल आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कायदेशीर कारवाई केली जाईल, असा सज्जड इशाराही त्यांनी दिला.
गणेशोत्सव मंडळांनी ‘आपले सरकार’ या ऑनलाइन पोर्टलद्वारे पोलिस विभागाची आवश्यक ती परवानगी वेळेत मिळवून घ्यावी. मंडप उभारताना सुरक्षेच्या दृष्टीने फायर सेफ्टीची योग्य ती काळजी घ्यावी आणि मंडप परिसरात सुरक्षेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत. तसेच मंडळांनी संस्कृतीला साजेसे आणि समाजप्रबोधन करणारे देखावे उभारावेत. मिरवणुकीत गुलालाचा अतिवापर करून पर्यावरणाला हानी पोहोचेल असे कोणतेही कृत्य करू नये आणि गणेशमूर्तीची उंचीही मर्यादित ठेवावी, असे आवाहन त्यांनी केले.
या बैठकीत उपस्थित गणेशोत्सव मंडळाच्या अध्यक्ष आणि पदाधिकाऱ्यांनी आपल्या विविध अडचणी पोलिस प्रशासनासमोर मांडल्या. विसर्जन मिरवणुकीतील वाहतूक कोंडी, विजेची व्यवस्था आणि इतर स्थानिक समस्यांकडे त्यांनी लक्ष वेधले. यावर सकारात्मक प्रतिसाद देत, प्रत्येक गणेशोत्सव मंडळाला एक पोलिस अंमलदार दिला जाईल आणि संपूर्ण मिरवणूक मार्गावर कडक पोलिस बंदोबस्त तैनात असेल, असे आश्वासन पोलिस अधीक्षकांनी दिले.
तसेच, गणेशोत्सवासाठी मुंबई आणि इतर भागांतून कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांच्या प्रवासाच्या सोयीसाठी मुंबई-गोवा महामार्गावर १० विशेष मदत केंद्रे उभारण्यात येणार असून, त्या ठिकाणी वाहना दुरुस्तीसाठी मॅकेनिकची सोयही उपलब्ध असेल. समुद्रकिनारी गणेशमूर्ती विसर्जनाच्या वेळी कोणतीही दुर्घटना घडू नये यासाठी जीवरक्षक (लाइफगार्ड्स) तैनात केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
या महत्त्वपूर्ण बैठकीला १०१ वर्षांची समृद्ध परंपरा लाभलेल्या टिळक आळी गणेशोत्सव मंडळाचे शशिकांत काळे, ‘रत्नागिरीचा राजा’ आठवडा बाजार मंडळाचे अशोक वाडेकर, शांतिनगर मंडळाचे अमेय पावसकर, कोकण रेल्वेचे अनंत महाबळे, ओमसाई मित्रमंडळ साळवी स्टॉपचे शार्दुल मोरे, उद्यमनगरच्या साक्षी सकपाळ, प्रादेशिक गणेशोत्सव मंडळाचे अभिजित नाखरे, महावितरणचे अक्षय शिवलकर, बंदर रोडचे तुषार भाटकर, मुरुगवाडा झोपडपट्टी मंडळाचे संजय राठोड, आणि पाटबंधारे-कुवारब मंडळाच्या पदाधिकाऱ्यांसह शहरातील तब्बल २७ प्रमुख गणेशोत्सव मंडळांचे अध्यक्ष व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.




