
रघुवीर घाटात पुन्हा दरड कोसळली; रत्नागिरी-सातारा मार्ग ठप्प!
रत्नागिरी आणि सातारा जिल्ह्यांना जोडणाऱ्या खेड तालुक्यातील रघुवीर घाटात गुरुवार दि. ३ सप्टेंबर रात्री पुन्हा मोठी दरड कोसळल्याने वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. डोंगर उतारावरील माती, दगड आणि मोठमोठ्या शिळा रस्त्यावर आल्याने दोन्ही बाजूंची वाहतूक बंद झाली असून, घाटातून प्रवास करणाऱ्या नागरिकांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. दरड कोसळल्याने सातारा जिल्ह्यातील घाटमाथ्यालगतच्या सुमारे १५ ते २० गावांचा रत्नागिरी जिल्ह्याशी असलेला संपर्क विस्कळीत झाला आहे.
रघुवीर घाट हा सातारा आणि रत्नागिरी जिल्ह्यांना जोडणारा महत्त्वाचा मार्ग आहे. घाटमाथ्यावरील अनेक गावांतील नागरिक शिक्षण, आरोग्य, बाजारपेठ तसेच विविध कामांसाठी खेड शहरात ये-जा करतात. मात्र, मार्गावरील वाहतूक ठप्प झाल्याने या गावांतील दैनंदिन वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली असून, शाळा-महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनाही त्याचा फटका बसला आहे.
दरड कोसळलेल्या ठिकाणी अकलपे-खेड एसटी बस सकाळपासून अडकून पडली आहे. बसमध्ये शालेय विद्यार्थी, महिला आणि अन्य प्रवासी असल्याने त्यांना घाटातच थांबावे लागले आहे. रस्ता पूर्णपणे बंद असल्याने बस पुढे किंवा मागे घेणेही शक्य झालेले नाही. खेडकडे शाळा, महाविद्यालय आणि अन्य कामांसाठी निघालेले नागरिकही दरड कोसळलेल्या ठिकाणी अडकले आहेत.
दरम्यान, दरड हटविण्यासाठी संबंधित यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली असून रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. मात्र, रस्त्यावर आलेल्या मोठ्या शिळा आणि दगड हटविण्यात अडथळे येत आहेत. केवळ जेसीबीच्या साहाय्याने हे काम करणे कठीण असल्याने मोठ्या दगडांचे तुकडे करण्यासाठी ब्रेकरचा वापर करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
मोठ्या प्रमाणात दरड कोसळल्याने रस्ता पूर्णपणे मोकळा करण्यास किती वेळ लागेल, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. रस्ता सुरक्षित होईपर्यंत नागरिकांनी या मार्गावरून प्रवास करताना खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
पावसाळ्यात रघुवीर घाटात वारंवार दरडी कोसळण्याच्या घटना घडत असल्याने घाटाच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. दरड कोसळल्यानंतर केवळ मलबा हटविण्याऐवजी घाटातील धोकादायक ठिकाणांची पाहणी करून कायमस्वरूपी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याची मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे.
सातारा आणि रत्नागिरी जिल्ह्यांदरम्यानची वाहतूक विस्कळीत झाल्याने घाटमाथ्यावरील गावांतील नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. अडकलेल्या एसटी बसमधील प्रवासी तसेच अन्य नागरिकांची परिस्थिती लक्षात घेऊन प्रशासनाने दरड हटविण्याचे काम वेगाने पूर्ण करून मार्ग लवकरात लवकर वाहतुकीसाठी खुला करावा, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.




