
चिपळूण रेल्वे स्थानकाच्या शहरालगतच्या बाजूची तिकीट खिडकी सुरू
शौकतभाई मुकादम यांच्या पाठपुराव्याला यश; मागील बाजूच्या सुशोभीकरणाची मागणी
चिपळूण : येथील रेल्वे स्थानकाच्या शहरालगतच्या बाजूस असलेली तिकीट खिडकी अनेक महिन्यांपासून बंद होती. गणेशोत्सवापूर्वी ही तिकीट खिडकी सुरू करण्यात यावी, अशी मागणी कोकण रेल्वे अन्याय निवारण समितीचे अध्यक्ष शौकतभाई मुकादम यांनी केली होती. त्यांच्या पाठपुराव्याची दखल घेत रेल्वे प्रशासनाने २ सप्टेंबरपासून ही तिकीट खिडकी पुन्हा सुरू केली आहे.
शौकतभाई मुकादम यांनी सुमारे १५ दिवसांपूर्वी चिपळूण रेल्वे स्थानकाला भेट देऊन शहरालगतच्या बाजूची बंद असलेली तिकीट खिडकी गणेशोत्सवापूर्वी सुरू करण्याची मागणी केली होती. ही मागणी मान्य झाल्याने चिपळूण शहरालगतच्या परिसरातील तसेच गुहागर तालुक्यातील अनेक गावांतील रेल्वे प्रवाशांची मोठी सोय झाली आहे.
दरम्यान, ३ सप्टेंबर रोजी मुकादम यांनी पुन्हा चिपळूण रेल्वे स्थानकाला भेट देऊन परिसराची पाहणी केली. यावेळी त्यांनी स्थानकाच्या मागील बाजूचा परिसर समोरील प्रशासकीय बाजूप्रमाणे सुशोभित करण्यात यावा, तसेच या परिसरातील रस्त्याचे डांबरीकरण करण्यात यावे, अशी मागणी रेल्वे प्रशासनाकडे केली.
शहरालगतच्या बाजूची तिकीट खिडकी सुरू केल्याबद्दल शौकतभाई मुकादम यांनी रेल्वे प्रशासन तसेच कमर्शियल सुपरवायझर खांबे यांचे आभार मानले आहेत.




