मूळच्या रत्नागिरीच्या विद्यानंद बापट यांना पुण्यात मारहाण; असीम सरोदे म्हणाले, “कट्टरतावादी भामट्यानेच हल्ला केला”


गणेशोत्सव किंवा सार्वजनिक उत्सावात डिजे किंवा लाऊडस्पीकर वापरावर बंदी आणावी, अशी मागणी पुण्यातील विद्यानंद बापट यांनी केली असून गेल्या काही दिवसांपासून ते याबद्दल आग्रही भूमिका मांडत आहेत.

त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून विद्यानंद बापट हे नाव महाराष्ट्रात चर्चेत आहे. आज ते एका वृत्तवाहिनीशी बोलत असतानाच त्यांच्यावर हल्ला झाला आणि त्यांना मारहाण करण्यात आली. या घटनेचा असीम सरोदे यांनी निषेध नोंदवला आहे आणि विद्यानंद बापट यांना पोलीस संरक्षण देण्याची मागणी केली आहे.

विद्यानंद बापट यांना मारहाण, असीम सरोदे काय म्हणाले?

गणेशोत्सवातील ध्वनी प्रदूषणाला विरोध दर्शवणाऱ्या विद्यानंद बापट यांना मारहाण झाली आहे, याबाबत कायदेतज्ज्ञ असीम सरोदे म्हणाले, पुणे ही चांगुलपणाची प्रयोगशाळा आहे. तशीच वाईटपणाचीही प्रयोगशाळा झाली आहे हे दुर्दैवाने मान्य करावं लागतं आहे. कट्टरतावादी शक्ती पुण्यात वाढू लागल्या आहेत, पुण्यातून वाढून सगळीकडे जात आहेत. त्यापैकीच कुणीतरी भामटा आहे त्याने बापट यांच्यावर हल्ला केला आहे. विद्यानंद बापट यांच्याशी बोललो, ते सुखरुप आहेत ही चांगली गोष्ट आहे. आपल्यापेक्षा वेगळं मत मान्यच करायचं नाही ही गोष्ट वाढीला लागली आहे, ही चुकीची प्रवृत्ती आहे.

विद्यानंद बापट हे जागल्याचं काम करत आहेत-सरोदे

विद्यानंद बापट हे जागल्याचं काम करत आहेत. ते जनजागृतीचं काम करत आहेत. समाजाला जाग आणणाऱ्यांना महात्मा फुले आणि सावित्रीमाई फुले यांच्यावर शेणमार झाली होती. आता ट्रोलिंगच्या स्वरुपात शिव्या खाव्या लागतात आणि कधी कधी मारही खावा लागतो. विद्यानंद बापट यांची ही सुरुवात आहे. त्यांनी मोठा विषय हाती घेतला आहे. महाराष्ट्रातील, देशातील ध्वनी प्रदूषण कमी झालं पाहिजे ही त्यांची भूमिका आहे. संवेदनशीलपणे सण आणि उत्सव साजरे केले पाहिजेत यासाठी ते लढा देत आहेत. आम्ही त्याच्यासोबत आहोत. असं असीम सरोदे यांनी म्हटलं आहे.

विद्यानंद बापट यांना मारहाण करणाऱ्यांना शासन झालं पाहिजे- सरोदे

आज जे घडलं ते चुकीचं आहे. मत स्वातंत्र्य दाबून टाकलं पाहिजे, विचार स्वातंत्र्य दाबून टाकलं पाहिजे असा विचार हे लोक करतात. पुण्यातच आपण पाहिलं आहे नरेंद्र दाभोलकरांची हत्या झाली तेव्हा. हा विचार वाढत चालला आहे. पोलिसांनी विद्यानंद बापट यांनी पोलीस संरक्षण दिलं पाहिजे, गणपती झाल्यानंतरही १० दिवस कारवाई झाली पाहिजे. पोलीस विद्यानंद बापट यांना मारहाण करणाऱ्यांना पकडून कठोर शासन दिलं गेलं पाहिजे असंही असीम सरोदे यांनी म्हटलंय.

विद्यानंद बापट नक्की कोण?

विद्यानंद बापट यांच्यामागे कोणताही राजकीय, सामाजिक असा मोठा परिचय नाही. ते एका सामान्य कुटुंबातील सामान्य व्यक्तिमत्व आहेत. हिंदुस्तान टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, विद्यानंद बापट हे ३७ वर्षीय असून ते बीपीओ क्षेत्रात काम करतात. त्यांचं बहुतांश काम हे घरातूनच सुरू असतं. मुळचे रत्नागिरीचे असलेले विद्यानंद बापट गेल्या ८ वर्षांपासून पुण्यातील नारायण पेठ येथे राहत आहेत. त्यांचे आई-वडिल अजूनही रत्नागिरीतच असून तिथंच विद्यानंद यांचं बालपण गेलं. तिथंच त्यांनी शिक्षण घेतलं.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button