दुभाजक तोडून टियागो विरुद्ध मार्गिकेत; समोरून येणाऱ्या अर्टिगाला भीषण धडक,

उन्हाळे येथील गंगा तिठ्यावर अपघातात आठ जण जखमी; टियागोतील चौघांची प्रकृती गंभीर


राजापूर : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर उन्हाळे येथील गंगा तिठा परिसरात मंगळवारी दुपारी झालेल्या भीषण अपघातात आठ जण जखमी झाले. मुंबईकडून गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या टाटा टियागो कारने अचानक रस्त्यावरील दुभाजक तोडून विरुद्ध दिशेच्या मार्गिकेत प्रवेश करत समोरून येणाऱ्या अर्टिगा कारला जोरदार धडक दिल्याने हा अपघात घडला. या धडकेत टियागो कारमधील चारही जण गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी दुपारी सुमारे २ वाजण्याच्या सुमारास मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरून टाटा टियागो कार गोव्याच्या दिशेने जात होती. त्याचवेळी गोव्याहून मुंबईच्या दिशेने अर्टिगा कार येत होती. अचानक टियागो कारने रस्त्यावरील दुभाजक तोडत विरुद्ध दिशेच्या मार्गिकेत प्रवेश केला आणि समोरून येणाऱ्या अर्टिगा कारला जोरदार धडक दिली.

धडक इतकी भीषण होती की दोन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. टियागो कारमधून प्रवास करणारे चारही जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

दरम्यान, अर्टिगा कारमध्ये दोन पुरुष आणि दोन महिला असे चार जण प्रवास करत होते. अपघातात चारही जण जखमी झाले असून, त्यापैकी एकाची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. इतर तिघा जखमींना पुढील उपचारासाठी कणकवली येथे हलविण्यात आले आहे.

अपघाताची माहिती मिळताच राजापूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. स्थानिक नागरिकांच्या मदतीने जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. या अपघातामुळे महामार्गावरील वाहतुकीवर काही काळ परिणाम झाला होता.

या भीषण अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून, राजापूर पोलीस पुढील तपास करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button