
राष्ट्रीय अवकाश दिवसानिमित्त तारांगण येथे बाल वैज्ञानिकांनी अनुभवला चांद्रयान शो
'खगोलप्रेमी रत्नागिरी ग्रुप' आणि 'आनंदालय एक्सपेरिअन्शियल होम स्कूल' यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यक्रम
रत्नागिरी : राष्ट्रीय अवकाश दिनाचे औचित्य साधून रत्नागिरीतील बालवैज्ञानिकांनी थेट अवकाशाची रंजक सफर अनुभवली. ‘खगोलप्रेमी रत्नागिरी ग्रुप’ आणि ‘आनंदालय एक्सपेरिअन्शियल होम स्कूल’ यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी माळनाका येथील श्रीमान हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे तारांगण येथे एका अनोख्या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी चांद्रयान शो अतिशय उत्साहाने पाहिला पाहिला.
केवळ नेहमीची व्याख्याने किंवा प्रेझेंटेशन न ठेवता, विद्यार्थ्यांनी स्वतः कृती करून विज्ञान अनुभवावे या उद्देशाने हा उपक्रम आखण्यात आला. इन्फोविजन संस्थेतर्फे ‘चांद्रयान-३’ वर आधारित ३६०-डिग्री (फुल डोम) शो दाखवण्यात आला. उत्कृष्ट ध्वनिव्यवस्था आणि मराठीतील सोप्या भाषेमुळे मुलांनी या शोचा मनमुराद आनंद घेतला व चंद्र मोहिमेची संपूर्ण माहिती समजून घेतली.
गोगटे- जोगळेकर महाविद्यालयातील प्रा. निशा केळकर यांनी विद्यार्थ्यांना ‘इस्त्रो’ या संस्थेचे कार्य, अंतराळ मोहिमा आणि खगोलशास्त्र ऑलिम्पियाड स्पर्धांविषयी मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनीही अत्यंत उत्साहाने आपल्या सर्व शंकांचे निरसन करून घेतले. मुलांनी सूर्यमालेची अचूक माहिती देणारी २D कागदी प्रतिकृती स्वतः तयार केली. यासोबतच पृथ्वी आणि चंद्र यांचे एकमेकांशी असलेले आकारमान व अंतर दर्शवणारी प्रतिकृतीही बनवली. हे सर्व साहित्य मुलांनी ‘स्टडी किट’ म्हणून आनंदाने घरी नेले.
रत्नागिरीतील माध्यमिक शाळांमधील ४० हून अधिक विद्यार्थ्यांनी या कार्यशाळेत सहभाग नोंदवला. नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष समीर तिवरेकर यांनी भेट देऊन या उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त केले. तसेच पालकमंत्री व उद्योगमंत्री डॉ. उदय सामंत यांच्या या तारांगण उपक्रमाचे कौतुक केले व शुभेच्छा दिल्या. नगरपालिकेचे पूर्ण सहकार्य देऊ, असे आश्वासन दिले.
ज्येष्ठ अभ्यासक सुहास गुर्जर, योगेश पेडणेकर, प्रा. बाबासाहेब सुतार व उपेंद्र बापट यांनी मुलांना सौरमालेचा आवाका सोप्या भाषेत समजावून सांगितला. स्नेहल मेस्त्री यांनी प्रात्यक्षिक सत्र घेतले.




