राजधानी पुन्हा हादरली! दिल्लीत धावत्या बसमध्ये 16 वर्षांच्या विद्यार्थिनीवर अत्याचार


देशाची राजधानी दिल्ली आणि नजीकच्या परिसरातून महिला सुरक्षेचा पुन्हा एकदा धिंडवडा उडवणारी अत्यंत संतापजनक बातमी समोर आली आहे. पावसाच्या अंधाऱ्या रात्री मदतीची अपेक्षा करून बसमध्ये चढलेल्या 16 वर्षांच्या अल्पवयीन विद्यार्थिनीला नराधमांकडून अमानुष अत्याचारांचा सामना करावा लागला.ग्रेटर नोएडा ते दिल्ली दरम्यानच्या तब्बल 47 किलोमीटरच्या प्रवासात धावत्या स्लीपर बसमध्ये दोन नराधमांनी या चिमुरडीवर अत्याचार केला. 2012 च्या अत्यंत भयावह अशा निर्भया प्रकरणाच्या 14 वर्षांनंतरही सार्वजनिक वाहतूक व्यवस्था महिलांसाठी सुरक्षित का ठरू शकली नाही, असा अत्यंत संतप्त सवाल या घटनेने पुन्हा एकदा निर्माण केला आहे.

47 किलोमीटरचा भयानक प्रवास

मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, 4 ऑगस्टच्या रात्री उत्तर प्रदेशातील मैनपुरी येथील रहिवासी असलेली 11 वीत शिकणारी ही मुलगी नोएडा सेक्टर-63 येथील आपल्या नातेवाईकांच्या घरी जाण्यासाठी निघाली होती. मात्र, मुसळधार पावसामुळे ती रस्ता भरकटली आणि परी चौक परिसरात पोहोचली. त्याच वेळी तिथून एक स्लीपर बस जात असल्याचे पाहून तिने बसला हात दाखवला.

बसमध्ये ड्रायव्हर कुलदीप आणि कंडक्टर संदीप उपस्थित होते. त्यांनी मुलीला सेक्टर-63 ला सुरक्षित सोडतो असे सांगून विश्वासात घेतले आणि बसमध्ये बसवले. परंतु, बस परी चौकवरून कश्मीरी गेटच्या दिशेने निघताच कंडक्टरने मुलीसोबत अश्लील चाळे करण्यास सुरुवात केली. त्यानंतर ड्रायव्हर आणि कंडक्टर या दोघांनी आळीपाळीने या चिमुरडीवर दुष्कर्म केले.

पीडित मुलगी गयावया करत सतत रोत राहिली, मात्र 47 किलोमीटरच्या संपूर्ण प्रवासात हे दोन्ही नराधम तिच्यावर अत्याचार करत राहिले आणि विरोध केल्यास जिवंत मारण्याची धमकी देत राहिले. अखेर उशिरा रात्री या नराधमांनी पीडितेला कश्मीरी गेट आयएसबीटी जवळील रिंग रोडवर अतिशय वाईट आणि असहाय्य अवस्थेत सोडून तिथून पळ काढला.या धक्कादायक घटनेने प्रचंड घाबरलेली पीडिता थेट कश्मीरी गेट पोलीस ठाण्यात पोहोचली आणि तिने आपबिती पोलिसांना सांगितली. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवली आणि परिसरातील सीसीटीव्ही (CCTV) फुटेज तपासण्यास सुरुवात केली.

बसचा नोंदणी क्रमांक आणि लोकेशन ट्रॅक करत पोलीस तिमारपूर येथील बस स्टँडवर पोहोचले, जिथे ती बस उभी होती. पोलिसांनी तत्परतेने कारवाई करत घटनेच्याच दिवशी आरोपी ड्रायव्हर कुलदीप आणि कंडक्टर संदीप या दोघांना मुसक्या आवळल्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button