
दुबईतील नोकरीच्या आमिषाने सावंतवाडीतील पाच तरुणांची लाखोंची फसवणूक
सावंतवाडी : दुबईतील आलिशान हॉटेलमध्ये आकर्षक पगाराची नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवत सावंतवाडीतील पाच सुशिक्षित तरुणांची लाखो रुपयांची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कोलवाळ-गोवा येथील सिद्धार्थ नावाच्या युवकाने या तरुणांकडून प्रत्येकी ४५ हजार रुपये घेत बनावट व्हिसा दिल्याचा आरोप असून, फसवणूक उघडकीस आल्यानंतर तो फरार झाल्याचे सांगण्यात येत आहे. याप्रकरणी संबंधित तरुण सावंतवाडी पोलिसांत तक्रार दाखल करण्याच्या तयारीत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, संशयित सिद्धार्थ याने सावंतवाडीतील पाच तरुणांना दुबईतील एका नामांकित हॉटेलमध्ये चांगल्या पगाराची नोकरी मिळवून देण्याचे आश्वासन दिले. त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवून तरुणांनी त्याला प्रत्येकी ४५ हजार रुपये दिले. पैसे घेतल्यानंतर मात्र त्याने नोकरीबाबत टाळाटाळ सुरू केली आणि काही दिवसांनी तरुणांचे फोनही घेणे बंद केले.
तरुणांनी पैशांची तसेच नोकरीची वारंवार विचारणा केल्यानंतर संशयिताने त्यांना व्हॉट्सॲपवर व्हिसाच्या प्रती पाठवल्या. तसेच, लवकरात लवकर पोलिस क्लिअरन्स सर्टिफिकेट मिळवून कामावर रुजू होण्यास सांगितले. मात्र, त्याच्या घाईगडबडीच्या हालचालींमुळे तरुणांना संशय आला.
त्यानंतर तरुणांनी व्हॉट्सॲपवर पाठविण्यात आलेल्या व्हिसाची ऑनलाइन पडताळणी केली असता तो बनावट असल्याचे समोर आले. फसवणूक उघडकीस आल्यानंतर तरुणांनी संशयिताकडे जाब विचारत पैसे परत मागितले. त्यावेळी त्याने रक्कम परत करण्याचे आश्वासन दिले; मात्र प्रत्यक्षात पैसे न देता त्याने संपर्क तोडला आणि अचानक गायब झाला.
आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर संतप्त तरुणांनी सावंतवाडी पोलिसांशी संपर्क साधला असून, संबंधिताविरोधात कायदेशीर कारवाई करण्याची तयारी सुरू केली आहे. परदेशात नोकरीचे आमिष दाखवून बेरोजगार तसेच सुशिक्षित तरुणांची फसवणूक करणाऱ्या व्यक्तींचा शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.




