लोटे एमआयडीसीतील कोकाकोला कंपनीचे सांडपाणी उघड्यावर; ग्रामस्थ आक्रमक


शेतीसह पर्यावरणाला धोका; चार ते पाच हजार नागरिकांच्या पाणी स्रोतांवर परिणाम होण्याची भीती


खेड : लोटे अतिरिक्त औद्योगिक वसाहतीतील कोकाकोला कंपनीकडून दुर्गंधीयुक्त सांडपाणी उघड्यावर सोडले जात असल्याचा प्रकार गुरुवारी सकाळी ग्रामस्थांच्या निदर्शनास आला. या सांडपाण्यामुळे परिसरातील शेती, नाले तसेच पर्यावरणाचे नुकसान होत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. विशेष म्हणजे, परिसरातील सुमारे चार ते पाच हजार नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याच्या नैसर्गिक स्रोतांनाही याचा धोका निर्माण होण्याची शक्यता ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.

ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, कंपनीकडून वारंवार दुर्गंधीयुक्त सांडपाणी परिसरात सोडले जात आहे. त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. सांडपाण्याचा शेतीवरही विपरीत परिणाम होत असल्याचा दावा ग्रामस्थांनी केला असून, या प्रकारामुळे नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे.

या समस्येबाबत एमआयडीसी प्रशासन तसेच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे यापूर्वी अनेकदा तक्रारी करण्यात आल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. मात्र, संबंधित यंत्रणांकडून अपेक्षित गांभीर्याने दखल घेतली जात नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

दरम्यान, सांडपाणी नेमके कोणत्या कारणामुळे उघड्यावर सोडण्यात आले, त्याची गुणवत्ता काय आहे आणि त्याचा परिसरातील जलस्रोत व शेतीवर नेमका काय परिणाम होत आहे, याची तातडीने तपासणी करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळाने घटनास्थळी पाहणी करून आवश्यक नमुने घ्यावेत आणि दोष आढळल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.

सांडपाणी सोडण्याचा प्रकार तातडीने थांबवण्यात आला नाही, तर ग्रामस्थांच्या वतीने रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.

यावेळी माजी तंटामुक्त समिती अध्यक्ष असगणी अशोक धाडवे आणि असगणी शिवसेना शाखाप्रमुख इस्माईल कादरी यांनी ग्रामस्थांची भूमिका मांडत संबंधित प्रशासनाने तातडीने कार्यवाही करण्याची मागणी केली

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button