मराठी शिकू, पण दहशत नको; मराठीच्या मुद्द्यावर Abhijit Rane यांचा ऑटो-टॅक्सी-कॅब संपाचा इशारा!

Abhijit Rane : मराठी भाषा शिकण्याच्या नियमावरून मुंबईतील ऑटो-रिक्षा, टॅक्सी आणि कॅबचालकांमध्ये निर्माण झालेला संभ्रम आता राजकीय संघर्षाच्या दिशेने जात आहे. उत्तर भारतीय ऑटोचालकांच्या तक्रारींना पाठिंबा देत भाजपा कामगार आघाडी मुंबईचे अध्यक्ष कामगार नेते अभिजीत राणे यांनी आक्रमक भूमिका घेत मनसेला थेट इशारा दिला आहे. ऑटोचालकांना त्रास देणे, मारहाण करणे किंवा दहशतीचे वातावरण निर्माण करणे खपवून घेतले जाणार नाही, असा स्पष्ट इशारा राणे यांनी दिला.

राणे यांनी आरटीओच्या कथित तपासणी पद्धतीवरही गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. अनेक चालकांनी मराठी भाषा परीक्षा उत्तीर्ण करून प्रमाणपत्र मिळवले असतानाही तपासणीदरम्यान निर्धारित अभ्यासक्रमा बाहेरील प्रश्न विचारले जात असल्याच्या तक्रारी आहेत. त्यामुळे चालकांमध्ये कारवाईची भीती निर्माण होत असल्याचा दावा करण्यात येत आहे. मराठी शिकण्याला विरोध नाही; मात्र मराठी शिकलेल्या कामगारांना त्रास देणे किंवा दहशतीखाली ठेवणे अजिबात सहन केले जाणार नाही, अशी भूमिका अभिजी राणे यांनी मांडली.

ऑटोचालकांवर दबाव किंवा मारहाण करण्याचा प्रयत्न झाल्यास आपण गप्प बसणार नसल्याचे राणे यांनी स्पष्ट केले. मनसेकडून ‌’ठोकशाही‌’चा मार्ग अवलंबला गेला, तर त्याला त्याच भाषेत उत्तर दिले जाईल, असा आक्रमक इशाराही त्यांनी दिला. “मेहनत करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या चालकांना कुणीही दहशतीच्या जोरावर काम करण्यापासून रोखू शकत नाही, असा संदेश राणे यांनी दिला.

50 ते 60 वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या अनेक चालकांसमोर नव्याने भाषा शिकणे आणि परीक्षा देण्याचे आव्हान उभे राहिले आहे. अनेक वर्षे मुंबईत व्यवसाय करणाऱ्या या चालकांमध्ये कारवाईच्या भीतीमुळे अस्वस्थता निर्माण झाल्याचे सांगण्यात येते. काही चालक तर महाराष्ट्र सोडण्याचा विचार करत असल्याचा दावा करण्यात आला आहे. मराठी परीक्षा आणि प्रमाणपत्राची प्रक्रिया पूर्ण केल्यानंतरही जर चालकांवर वेगळ्या निकषांनुसार कारवाई केली जात असेल, तर ही प्रक्रिया स्पष्ट आणि पारदर्शक करण्याची गरज असल्याचे राणे यांनी म्हटले आहे. आरटीओची कथित सख्ती तातडीने थांबली नाही, तर ऑटो, टॅक्सी आणि कॅबचालकांना सोबत घेऊन राज्यव्यापी आंदोलन उभारण्याचा इशारा त्यांनी दिला.

गरज पडल्यास राज्यव्यापी ऑटो-टॅक्सी-कॅब हडतालचा मार्ग स्वीकारला जाईल, असा इशाराही राणे (Abhijit Rane) यांनी दिल्याने हा भाषा-विवाद आता अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. भाषा शिकविणे हा सकारात्मक उपक्रम असला, तरी त्याची अंमलबजावणी कामगारांना त्रासदायक ठरू नये, अशी भूमिका पुढे येत आहे. त्यामुळे सरकार आणि आरटीओ प्रशासन या तक्रारींची दखल घेऊन तपासणी प्रक्रियेबाबत स्पष्टता आणणार का, याकडे आता लक्ष लागले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button