
सीजेपीची पुन्हा दिल्लीत धडक, शिक्षक दिनीच इंडिया गेटपासून मोर्चा; अभिजीत दिपकेंचा सरकारला इशारा!
नवी दिल्ली : नीट पेपरफुटी आणि परीक्षांच्या मुद्द्यांवरुन दिल्लीच्या जंतरमंतरवर कॉकरोच जनता पार्टीने बेमुदत आंदोलन केल्यानंतर अखेर केंद्रीय शिक्षणमंत्र्यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला. त्यावेळी, केंद्र सरकारच्यावतीने सीजेपीला (CJP) काही आश्वासनं देण्यात आली होती. संबंधित आंदोलनावेळी विद्यार्थ्यांवर दाखल गुन्हे मागे घेण्याचंही आश्वासन देण्यात आलं. मात्र, सरकारने आश्वासन पाळलं नसल्याचे सांगत सीजेपी पुन्हा एकदा आंदोलनाच्या तयारीत आहे. दुसरीकडे सीजेपीचे संस्थापक अभिजीत दिपकेंनी स्कुल ठीक करो अभियान सुरू केलं असून सरकारची शाळांची दूरवस्था पाहून संताप व्यक्त केला आहे. त्याच पार्श्वभूमीवर आता सीजेपीने 5 सप्टेंबर म्हणजेच शिक्षक दिनी आंदोलनाची घोषणा केली आहे.
सीजेपीकडून 5 सप्टेंबर रोजी दिल्लीत शांततापूर्ण मोर्चाची घोषणा करण्यात आली असून 25 जुलैला सरकारने दिलेली आश्वासने पाळली नसल्याचे CJP ने म्हटलं आहे. त्यामुळे, इंडिया गेटपासून नवी दिल्ली पोलीस मुख्यालयापर्यंत कॉकरोच जनता पार्टीच्यावतीने मोर्चा काढण्यात येणार आहे. NEET पीडितांच्या कुटुंबीयांसह पोलिसांच्या हल्ल्यात जखमी झालेल्या, पोलीस अत्याचाराचे पीडित कुटुंबीय या मोर्चाचे नेतृत्व करणार आहे. 18 ऑगस्टला सर्वोच्च न्यायालयाने FIR ची यादी मागूनही सरकारने स्पष्ट आश्वासन दिले नसल्याचा दावा सीजेपीच्यावतीने करण्यात आला आहे. सरकारने विद्यार्थ्यांना आणि सीजेपीच्या शिष्टमंडळाला दिलेला शब्द पाळावा, अशी मागणी कॉकरोच जनता पार्टीने केली आहे.
दरम्यान, विद्यार्थी, युवा संघटना आणि देशभरातील तरुणांनी 5 सप्टेंबर रोजी होणाऱ्या मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचं आवाहन देखील करण्यात आलं आहे.
सरकारकडून एफआयआरची यादी दिली जात नाही
सीजेपीने म्हटले आहे की, 18 ऑगस्ट रोजी सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारकडे विद्यार्थी आणि आंदोलकांविरुद्ध दाखल केलेल्या सर्व एफआयआरच्या यादीची मागणी केली होती. पक्षाचा दावा आहे की, न्यायालयाने कलम 142 अंतर्गत हे खटले रद्द करण्याचा विचार करायला हवा होता. केंद्र सरकारने एफआयआरची यादी देण्याचे स्पष्ट आश्वासन दिलेले नाही, असा सीजेपीचा आरोप आहे. आंदोलन संपण्यापूर्वी दिलेल्या आश्वासनांवरून सरकारने माघार घेतल्याचे हे लक्षण आहे, असा पक्षाने अर्थ लावला आहे. सीजेपी नेते सौरभ दास आणि रत्ना सिंह यांनी म्हटले आहे की, आंदोलन संपल्यानंतर सरकारने दिलेली आश्वासने पूर्ण करावीत. सर्व एफआयआर मागे घ्यावेत आणि शांततापूर्ण आंदोलकांवरील कारवाई थांबवावी.
जयपूरमधील सरकारी शाळेत हिंसाचार
दुसरीकडे, सीजेपीच्या “शाळा दुरुस्त करा” मोहिमेदरम्यान जयपूरमधील रामपुरा-कंवरपुरा गावात पक्षाच्या कार्यकर्त्यांवर हिंसाचार झाला. सीजेपीचे प्रवक्ते आशुतोष रांका यांनी मागणी केली आहे की, राजस्थान सरकारने एफआयआरवर कारवाई करावी आणि हिंसाचारात सामील असलेल्यांना अटक करावी. त्यांनी सांगितले की, सीजेपी कार्यकर्त्यांविरुद्ध पुरावे आढळल्यास पक्षावर कायदेशीर कारवाई केली जाईल.



