“खो-खो”ला पाठबळ हीच अजितदादांना खरी आदरांजली


उद्योगमंत्री उदय सामंत : सांगलीत राष्ट्रीय स्पर्धेचे आयोजन


“महाराष्ट्रातील सर्व जिल्हा खो-खो संघटनांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी येत्या १५ दिवसांत उद्योग विभागातर्फे विशेष बैठकीचे आयोजन करू. या बैठकीत ठोस धोरणात्मक निर्णय घेऊन राज्यातील सर्व संघटनांना भक्कम आर्थिक पाठबळ दिले जाईल,” असे आश्वासन उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिले. तसेच ज्या खो-खो खेळाला राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी नेहमीच भक्कम पाठबळ दिले, त्या खेळाच्या पाठीशी पूर्ण ताकदीने आणि खंबीरपणे उभे राहणे ही माझी प्राथमिक जबाबदारी आहे. हीच अजितदादांसाठी खरी आदरांजली ठरेल,” असेही त्यांनी आवर्जुन सांगितले.
महाराष्ट्र खो-खो असोसिएशनच्या मान्यतेने सांगली द अॅम्युचर खो-खो असोसिएशन आणि सद्गुरु गाडगे महाराज कॉलेज कराड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यस्तरीय खो-खो पंच व तांत्रिक अधिकारी प्रशिक्षण शिबीराच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. या शिबीराचे उद्घाटन उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते रिमोट द्वारे दीप प्रज्वलनाने करण्यात आले. याप्रसंगी ते म्हणाले, “वाळवा-सांगली येथे तुम्ही जेव्हा सांगाल, तेव्हा राष्ट्रीय खो-खो स्पर्धेचे भव्य दिव्य आयोजन करू. त्यासाठी गौरव नायकवडी आणि सांगली जिल्हा खो-खो असोसिएशनला जे काही सहकार्य लागेल, ते सर्व सहकार्य मी शासन स्तरावर तत्परतेने करेन.”
याप्रसंगी मंत्री सामंत यांनी जिल्हा संघटना बळकट करण्यासाठी महत्वाची घोषणा केली. ते म्हणाले,

या कार्यक्रमावेळी द ॲम्युचर खो-खो असोसिएशन (सांगली) चे अध्यक्ष गौरवभाऊ नायकवडी, सद्गुरु गाडगे महाराज कॉलेजचे प्राचार्य डॉ. चंद्रकांत खिलारे, सातारा जिल्हा असोसिएशनचे अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर, राज्य असोसिएशनचे सचिव डॉ. चंद्रजित जाधव, खानापूर-आटपाडीचे आमदार सुहास बाबर, कराडचे नगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव, महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे खजिनदार ॲड. गोविंद शर्मा व कार्याध्यक्ष सचिन गोडबोले, यांच्यासह रयत शिक्षण संस्थचे सदस्य ॲड. सदानंद चिंगळे व ॲड. सत्यजित पवार, सांगली असोसिएशनचे उपाध्यक्ष अर्जुन माने, कार्याध्यक्ष डॉ. समीर शेख, पैलवान चंद्रहार दादा पाटील, पैलवान संतोष वेताळ आणि माजी आमदार दीपक चव्हाण यांच्यासह क्रीडा क्षेत्रातील अनेक दिग्गज, खो-खो प्रेमी व स्थानिक पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दरम्यान, यंदाच्या राज्यस्तरीय खो-खो पंच शिबीराला राज्यभरातून उत्स्फुर्त प्रतिसाद लाभला. दोन दिवस चालणाऱ्या या शिबिरात ६०० पेक्षा अधिक पंच आणि पदाधिकारी उपस्थित आहेत.

───

डॉ. चंद्रजीत जाधव यांचा मानपत्र देऊन सत्कार

या कार्यक्रमात संघटनेच्या वतीने राज्य खो-खो असोसिएशनचे सचिव डॉ. चंद्रजीत जाधव यांना मानपत्र प्रदान करून मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी मंत्री सामंत यांनी डॉ. जाधव यांच्या खो-खोतील कार्याचा गौरव केला. ते म्हणाले, “डॉ. जाधव यांना देण्यात आलेले मानपत्र मी अतिशय लक्षपूर्वक ऐकले. त्यावरून खो-खो या पारंपरिक खेळाप्रती त्यांचे योगदान किती मोठे आणि मोलाचे आहे, याची मला जाणीव झाली. क्रीडा क्षेत्राच्या प्रगतीसाठी अशा प्रकारचे समर्पित आणि अभ्यासू कार्यकर्ते प्रत्येक खेळात तयार होणे गरजेचे आहे.”

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button