
दहशतवादाशी संबंधित तक्रारी आहेत’ म्हणत अटक करण्याची भीती;रत्नागिरीत ६५ वर्षीय महिलेची ८७ लाखांची सायबर फसवणूक
रत्नागिरी जिल्ह्यात वेळोवेळी पोलिसांनी जागृती करूनही ऑनलाइन फसवणुकीचे प्रकार थांबण्याची चिन्हे नाहीत सायबर चोरटे वेगवेगळ्या क्लुप्त्या लढवून मोठ्या प्रमाणावर नागरिकांची फसवणूक करत आहेत दहशतवादाशी संबंधित तक्रारी दाखल असल्याचे सांगत पोलिसांकडून अटक होण्याची भीती दाखवून रत्नागिरी शहरातील ६५ वर्षीय महिलेची तब्बल ८७ लाख ४५ हजार ५४३ रुपयांची सायबर फसवणूक करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी रत्नागिरी शहर पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १३ ते १९ ऑगस्ट २०२६ या कालावधीत शिवनेरी, तेलीआळी, रत्नागिरी येथे ही घटना घडली. मधुश्री विलास पुनसकर (वय ६५) यांना अज्ञात व्यक्तींनी मोबाईलवरून संपर्क साधला. त्यांनी आपली नावे नीरज कुमार आणि प्रदीप जयस्वाल अशी सांगत आपण ‘मिनिस्ट्री ऑफ इंडिया’मधून बोलत असल्याचे भासवले.
पनसकर यांच्या आधारकार्डशी लिंक असलेल्या मोबाईल क्रमांकाविरुद्ध दहशतवादाशी संबंधित अनेक तक्रारी दाखल असल्याचे सांगण्यात आले. या प्रकरणात पोलिसांकडून अटक होऊ शकते, अशी भीती निर्माण करून त्यांना मानसिक दबावाखाली आणण्यात आले.
त्यानंतर कथित प्रकरणातून सुटका करून घेण्यासाठी त्यांच्या आर्थिक व्यवहारांची पडताळणी करावी लागेल, तसेच त्यांच्या व पतीच्या नावावरील ठेवी मनी लॉन्ड्रिंगच्या पैशातून घेतल्या आहेत किंवा नाहीत, याची तपासणी करण्यात येईल, असे सांगण्यात आले. तपासणी पूर्ण झाल्यानंतर संबंधित रक्कम परत करण्यात येईल, असा खोटा विश्वासही देण्यात आला.
या भूलथापांना बळी पडून पुनसकर यांनी अज्ञात व्यक्तींनी सांगितलेल्या विविध माध्यमांतून ८७ लाख ४५ हजार ५४३ रुपये दिले. मात्र त्यानंतरही रक्कम परत न मिळाल्याने आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले.
घटनेनंतर पुनसकर यांनी रत्नागिरी शहर पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिसांकडून सुरू असून, आरोपींनी कोणत्या पद्धतीने पैसे उकळले आणि या फसवणुकीमागे आणखी कोणाचा सहभाग आहे, याचा शोध घेतला जात आहे.




