
आंबा घाटातून एसटीची वाहतूक पुन्हा सुरू; देवरुख-लातूर बस घाटातून सुखरूप रवाना
संगमेश्वर तालुक्यातील रत्नागिरी-नागपूर महामार्गावरील आंबा घाटातील ओझरे खिंड येथे रस्ता खचल्याने ९ ऑगस्टपासून एसटी वाहतूक बंद होती. त्यामुळे प्रवासी, नोकरदार आणि वाहनधारकांची मोठी गैरसोय होत होती.
आंबा घाटातील परिस्थितीची आमदार किरण उर्फ भैया सामंत, जिल्हाधिकारी मनुज जिंदल, संगमेश्वरच्या तहसीलदार अमृता साबळे, कोल्हापूरचे जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांच्यासह महसूल, बांधकाम आणि पोलीस प्रशासनातील अधिकाऱ्यांनी पाहणी केली. रस्ता खचलेल्या भागात वेगावर नियंत्रण ठेवून सावधपणे वाहतूक सुरू करण्याबाबत सूचना करण्यात आल्या.
विभाग नियंत्रक जानराव यांच्या आदेशानंतर रत्नागिरी विभागाने आंबा घाटातून एसटी वाहतूक सुरू केली. आज सकाळी ७.१५ वाजता देवरुख बसस्थानकातून सुटलेली देवरुख-लातूर एसटी बस आंबा घाटातून सुखरूप पार झाली.
रस्ता खचलेल्या ओझरे खिंडीच्या ठिकाणी एसटी चालक-वाहकांना मार्गदर्शन करण्यासाठी सहाय्यक वाहतूक निरीक्षक गणेश वायदंडे, टीसी सुनील माळी, चालक विश्वास कनवजे आणि यशवंत मयेकर यांची मार्ग तपासणी टीम तैनात करण्यात आली आहे. या ठिकाणी वाहन अत्यंत सावकाश चालविण्याच्या सूचना देण्यात येत आहेत.
एसटी वाहतूक सुरू झाल्याने प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला असून, यासाठी संबंधित प्रशासन आणि अधिकाऱ्यांचे प्रवाशांनी आभार मानले.




