माजी नगरसेविका राजश्री शिवलकर यांचे निधन; रत्नागिरीत शोककळा


रत्नागिरी शहरातील मांडवी परिसराच्या माजी नगरसेविका सौ. राजश्री बिपीन शिवलकर (वय ५२) यांचे सोमवारी मध्यरात्री कोल्हापूर येथे उपचारादरम्यान निधन झाले. त्यांच्या निधनाने मांडवी परिसरासह संपूर्ण रत्नागिरी शहरात आणि राजकीय वर्तुळात शोककळा पसरली आहे.

सुमारे आठ दिवसांपूर्वी राजश्री शिवलकर यांना त्यांच्या घरी अचानक हृदयविकाराचा झटका आला होता. प्रकृती गंभीर झाल्याने त्यांना तत्काळ रत्नागिरीतील रुग्णालयात दाखल करण्यात आले. पुढील उपचारांसाठी त्यांना कोल्हापूर येथील रुग्णालयात हलविण्यात आले होते. मात्र उपचार सुरू असतानाच सोमवारी मध्यरात्री त्यांची प्राणज्योत मालवली.

राजश्री शिवलकर या कॉलेज जीवनापासूनच मृदूभाषी, प्रेमळ आणि मनमिळावू स्वभावासाठी परिचित होत्या. भारतीय जनता पक्षाच्या तिकिटावर मांडवी भागातून नगरसेविका म्हणून त्यांनी काम केले. नगरसेविका पदाच्या कार्यकाळात प्रभागातील विविध विकासकामांसाठी त्यांनी योगदान दिले.

त्यांची अंत्ययात्रा मंगळवारी दुपारी १२ वाजता मांडवी येथील राहत्या घरातून निघणार असून, मिरकरवाडा येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात पती आणि दोन मुलगे असा परिवार आहे.

राजश्री शिवलकर यांच्या निधनाने सामाजिक, राजकीय आणि मित्रपरिवारात हळहळ व्यक्त होत असून, विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button