
झाडावर चढला साप. आणि सर्पमित्रांची कसोटी!
नागपूर : शहराच्या परिसरात अति दुर्मीळ समजल्या जाणाऱ्या ‘फॉस्टेन कॅट स्नेक’ची दुसऱ्यांदा नोंद झाली. हुडकेश्वर परिसरातील अड्याळी गावात रविवारी पहाटेच्या सुमारास हा मोठा तपकिरी रंगाचा साप घरालगतच्या झाडावर आढळून आला. साप दिसल्याने परिसरातील नागरिकांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, सर्पमित्राने घटनास्थळी पोहोचून या सापाची ओळख पटवली आणि त्याला सुरक्षितपणे पकडून नैसर्गिक अधिवासात सोडले.
आधी गावकऱ्यांना दिसला
अड्याळी गावातील रहिवासी राहुल पटले यांना रविवारी पहाटे सुमारे तीन वाजता घरालगतच्या झाडावर मोठा साप दिसला. सापाचा आकार आणि रंग पाहता त्यांनी तातडीने सर्पमित्रांशी संपर्क साधला. सर्पमित्र प्रतीक धवड यांना याबाबत माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. झाडावर असलेल्या सापाला काळजीपूर्वक रेस्क्यू करण्यात आले. तपासणीदरम्यान हा फॉस्टेन कॅट स्नेक असल्याचे स्पष्ट झाले. नागपूर शहर आणि परिसरात या सापाच्या नोंदी तुलनेने दुर्मीळ आहेत. त्यामुळे शहराच्या हद्दीत पुन्हा एकदा या प्रजातीचा साप आढळणे हे जैवविविधतेच्या दृष्टीने महत्त्वाचे मानले जात आहे. जंगल आणि नैसर्गिक अधिवासाच्या आसपासची झाडे, दाट वनस्पती तसेच उपलब्ध भक्ष्य यामुळे अशा प्रजातींचे अस्तित्व शहराच्या काठावरील भागातही आढळून येऊ शकते.
दिसायला भितीदायक, मात्र आक्रमक नसलेला साप
फॉस्टेन कॅट स्नेक हा ‘बोइगा’ वंशातील मोठ्या आकाराचा साप आहे. त्याचे शरीर लांबट आणि काहीसे बाजूने चपटे असते. डोके मानेपेक्षा स्पष्टपणे रुंद असून डोळ्यांच्या बाहुल्या उभ्या असतात. त्यामुळे त्याचे डोळे मांजराच्या डोळ्यांसारखे दिसतात आणि त्याला ‘कॅट स्नेक’ असे नाव मिळाले आहे. डोळ्यांच्या मागील भागापासून तोंडाच्या दिशेने जाणारी गडद पट्टी हेही त्याचे एक वैशिष्ट्य आहे. या सापाच्या शरीरावर काळसर किंवा तपकिरी रंगाचे चौकटीदार अथवा ठिपक्यांचे नमुने दिसतात. काही सापांचा रंग लालसर-तपकिरी किंवा पिवळसर असतो, तर काहींचा रंग राखाडी किंवा फिकट दिसतो. या रंग आणि शरीरावरील नक्षीमध्ये भौगोलिक भागानुसारही फरक आढळतो. उपलब्ध प्रजातीविषयक नोंदीनुसार या सापाची कमाल लांबी सुमारे २.३ मीटरपर्यंत आढळू शकते.
निशाचर आणि झाडांवर राहणारा
फॉस्टेन कॅट स्नेक प्रामुख्याने निशाचर आहे. रात्रीच्या सुरुवातीपासून पहाटेपर्यंत तो अधिक सक्रिय असतो. दिवसा झाडांच्या ढोली, दाट वनस्पती, गुहा किंवा इतर सुरक्षित ठिकाणी तो लपून राहतो. हा वृक्षवासी असल्याने झाडांवर भक्ष्याचा शोध घेणे आणि तेथेच वास्तव्य करणे त्याच्या जीवनशैलीचा भाग आहे. सरडे, लहान पक्षी, वटवाघळे यांसह विविध लहान प्राणी त्याचे खाद्य आहेत. त्यामुळे जंगलातील अन्नसाखळीतही या सापाची भूमिका आहे. काही नोंदींमध्ये उंदीर, बेडूक, इतर साप आणि पक्ष्यांची अंडी यांचाही त्याच्या आहारात समावेश असल्याचे नमूद करण्यात आले.




