महिनेभर खड्डे तसेच, उद्योग मंत्री उदय सामंत यांचा दौरा ठरताच रातोरात मलमपट्टी; चाकण-तळेगाव रस्त्यावर प्रशासनाची धावपळ!


उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या संभाव्य दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाला अखेर जाग आली आहे. अनेक महिन्यांपासून दुर्लक्षित असलेल्या चाकण-तळेगाव रस्त्यावरील खड्डे शनिवारी (ता. १५) रात्रीच्या अंधारात बुजवण्यात आले असून, परिसरातील कचराही उचलण्यात आला आहे. यामुळे प्रशासनाच्या नेहमीच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

चाकण औद्योगिक वसाहतीमधील रस्त्यांची दुरवस्था आणि वाहतूक कोंडीमुळे नागरिक व कामगार अनेक दिवसांपासून त्रस्त होते. वारंवार तक्रारी करूनही याकडे दुर्लक्ष करणाऱ्या प्रशासनाने, उद्योगमंत्री उदय सामंत यांचा दौरा निश्चित होताच युद्धपातळीवर कामाला सुरुवात केली. रात्री उशिरापर्यंत चाकण-तळेगाव रस्त्यावर स्वच्छता मोहीम राबवत रस्त्याच्या कडेला साचलेला कचरा आणि राडारोडा हटवण्यात आला.

तसेच, संभाव्य दौऱ्याच्या मार्गावरील चौक स्वच्छ करण्यात आले. सामाजिक कार्यकर्ते दीपक मांडेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित ठेकेदार कंपनीने सुमारे पाचशे डंपर मुरूम आणि खडी वापरून रस्त्यांवरील खड्डे बुजवले. मंत्र्यांच्या दौऱ्यामुळे का होईना, पण रस्त्यांची तात्पुरती दुरुस्ती झाल्याने वाहनचालकांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

मात्र, ही मलमपट्टी तात्पुरती न राहता, प्रशासनाने रस्त्यांची नियमित देखभाल करून कायमस्वरूपी उपाययोजना करावी, अशी मागणी नागरिक, कामगार आणि उद्योजकांमधून जोर धरू लागली आहे. दुरुस्तीसाठी ५९ कोटी तळेगाव-चाकण-शिक्रापूर मार्गाच्या दुरुस्तीसाठी सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांनी ५९ कोटींचा निधी मंजूर केला होता. मात्र, ठेकेदाराने कामच सुरू केले नव्हते. आता उद्योगमंत्र्यांच्या दौऱ्यामुळे त्याच ठेकेदाराने रातोरात खड्डे बुजवण्याचे काम हाती घेतले.

या मार्गांवर खड्डे तसेच तळेगाव-चाकण मार्गावरील खड्डे रात्रीच्या वेळी मोठ्या प्रमाणात बुजवले; परंतु चाकण आंबेठाण मार्गावरील, चाकण-शिक्रापूर मार्गावरील खड्डे अजूनही तसेच आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button