
स्वातंत्र्य दिनापासून कॉक्रोच जनता पार्टीचा नवा कार्यक्रम; संसदेची इमारत उभी राहते मग ग्रामीण भागात शाळा का नाहीत, अभिजीत दिपके यांचा सवाल!
छत्रपती संभाजीनगर : गेल्या ८० वर्षात ग्रामीण भागातील सरकारी शाळांकडे आपण कमालीचे दुर्लक्ष केले. पंतप्रधानाचे नवे घर आणि संसदेची नवी इमारत उभी राहते. पण गावागावातील शाळांमध्ये स्वच्छतागृहाची सोय उपलब्ध करुन दिली गेली नाही.
८० वा स्वातंत्र्यदिन साजरा करताना आता गावागावात शाळा उभ्या करण्यासाठी पालकांनी शाळांचे सामाजिक लेखापरीक्षण करावे आणि त्यांची छायाचित्रे क्रॉक्रोच जनता पार्टीकडे पाठवावीत, असे आवाहन आंदोलक अभिजीत दिपके यांनी केले आहे.
दिपके यांनी एक प्रतिक्रिया चलचित्रण करुन नोंदवली असून त्यात त्यांनी ग्रामीण भागातील शाळांचा प्रश्न हाती घेतला आहे. दिपके म्हणाले, ‘ ८० वा स्वातंत्र्यदिन साजरा करताना एका बाबीकडे कमालीचे दुर्लक्ष केले ते म्हणजे ग्रामीण भागातील शाळा. जर संसदेची नवी इमारत बांधता येते, पंतप्रधानाचे नवे घर होते तर मग ग्रामीण भागातील शाळा का नाही उभ्या राहिल्या. गावातील मुले आपल्या देशाचे भवितव्य नाहीत, असे आपल्याला वाटते का, असे प्रश्न उपस्थित करत दिपके यांनी शाळा सुधाराव्यात म्हणून गावागावातील सरपंचानी या प्रश्नी लक्ष घालावे, अशी विनंती केली आहे.
हा स्वातंत्र्यदिन साजरा करताना हिंगोली जिल्ह्यातील मूळ गावी जाऊन शाळाच्या पायाभूत सुविधांबाबत जागृती करू. ‘ असेही दिपके म्हणाले. गावागावातील शाळांमधील पायाभूत सुविधांची स्थिती जाणून घेण्यासाठी पालकांनी शाळेत जावे. आपल्या मुलांना पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहाची स्थिती याविषयीची माहिती कळविण्यासाठी एक फॉर्म विकिसित केला जाईल. त्यात माहिती भरुन पाठवावी तसेच ज्यांनी शाळा चांगली केली अशा सरपंचाचे ‘ सीजेपी ‘ कडून कौतुक करू, ते फोटो समाजमाध्यमातून देऊन त्याचे श्रेय देऊ, असे दिपके यांनी सांगितले.
‘ नीट ‘ आंदोलनानंतर ग्रामीण भागातील शाळांवर लक्ष केंद्रीत करत दिपके यांनी शाळांचे लेखापरीक्षण करण्याचे आवाहन पालकांना केले आहे. स्वातंत्र्य दिनापासून ‘सीजेपी’ ग्रामीण भागातील शाळांवर लक्ष देईल, असा थेट संदेश दिपके यांनी दिला आहे.




