
एफडीएचा दणका! अमूल-गोकुळच्या नावाने बनावट दूध विक्रीचा पर्दाफाश; मुंबईत चौघांना अटक
अमूल आणि गोकुळसारख्या नामांकित दूध कंपन्यांच्या नावाचा वापर करून बनावट दूध पिशव्या तयार करणाऱ्या टोळीचा गुन्हे शाखेने पर्दाफाश केला. दहिसर पूर्व परिसरात कारवाई करून पोलिसांनी चार आरोपींना अटक केली आहे.या कारवाईत ४७० लिटर दूध, १३ हजार बनावट रिकाम्या पिशव्या, पिशव्या तयार करण्याची मशिनरी आणि अन्य साहित्य असा एकूण १० लाख ७९ हजार ७५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
दहिसर परिसरात अमूलच्या नावाच्या पिशव्यांमध्ये भेसळयुक्त दूध भरून विकले जात असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या कक्ष-१२ला मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी दहिसर पूर्व येथे छापा टाकला.
तेथे अमूल गोल्ड, अमूल ताजा आणि गोकुळच्या पिशव्या कापून त्यातील काही दूध बाहेर काढले जात होते. त्यानंतर त्यात अस्वच्छ पाणी मिसळून पिशव्या पुन्हा सील केल्या जात होत्या. या पिशव्या अस्सल दूध असल्याचे भासवून विक्रीसाठी तयार केल्या जात होत्या.पोलिसांनी भेसळयुक्त दूध आणि त्यासाठी वापरले जाणारे साहित्य ताब्यात घेतले. तसेच नामांकित कंपन्यांच्या नावाच्या बनावट पिशव्या तयार करण्यासाठी वापरली जाणारी सुमारे १० लाख रुपये किमतीची मशिनरीही जप्त केली.



