पुणे-सातारा महामार्गावर भीषण अपघात; कार डिव्हायडर ओलांडून ट्रकला धडकली, चौघांचा जागीच मृत्यू


पुणे-सातारा महामार्गावरील शिरवळजवळ मध्यरात्रीच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात मावळ आणि तळेगाव दाभाडे परिसरातील चार तरुणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. भरधाव टाटा नेक्सॉन कारचा ताबा सुटल्याने ती डिव्हायडर ओलांडून विरुद्ध दिशेच्या मार्गावर गेली आणि समोरून येणाऱ्या आयशर ट्रकवर जाऊन आदळली.या दुर्घटनेत दोन जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

ही दुर्घटना शिरवळ येथील हॉटेल शिवालयसमोर पहाटे सव्वा एकच्या सुमारास घडली. मिळालेल्या माहितीनुसार, टाटा नेक्सॉन कारमधून काही तरुण साताऱ्याच्या दिशेने प्रवास करत होते. प्रवासादरम्यान चालकाचा कारवरील ताबा सुटला. कार वेगात असल्याने ती थेट रस्त्यावरील डिव्हायडरला ओलांडून विरुद्ध लेनमध्ये गेली. त्याचवेळी समोरून येणाऱ्या आयशर ट्रकला कारची जोरदार धडक झाली.

धडक इतकी भीषण होती की कारचा मोठ्या प्रमाणात चक्काचूर झाला. अपघाताची माहिती मिळताच परिसरातील नागरिक आणि संबंधित यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली. कारमध्ये अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी मदतकार्य करण्यात आले. मात्र या दुर्घटनेत वेदांत वारिंगे, सोनलिंग ठाकूर, आदित्य गरुड आणि निखिल राऊत या चार तरुणांचा मृत्यू झाला.अपघातात आणखी दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. जखमींची प्रकृती गंभीर असल्याची माहिती समोर आली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button