
सौदळ मुसलमावाडी येथील ३० वर्षीय महिला बेपत्ताचार दिवस शोध घेऊनही ठावठिकाणा नाही; राजापूर पोलिसांत तक्रार दाखल
राजापूर : तालुक्यातील सौदळ मुसलमावाडी येथून ३० वर्षीय महिला बेपत्ता झाल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी महिलेच्या वडिलांनी राजापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, पोलीस तिचा शोध घेत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शबनम युसुफ पाटणकर असे बेपत्ता महिलेचे नाव आहे. त्या ४ ऑगस्ट रोजी रात्री साडेअकरा ते ५ ऑगस्ट रोजी पहाटे दोन वाजण्याच्या दरम्यान सौदळ मुसलमावाडी येथील घरातून कोणालाही काहीही न सांगता बाहेर पडल्या. त्यानंतर कुटुंबीयांनी नातेवाईक तसेच परिसरात त्यांचा शोध घेतला. मात्र, त्या आढळून न आल्याने शोधमोहीम सुरू ठेवण्यात आली.
चार दिवस विविध ठिकाणी शोध घेऊनही त्यांचा ठावठिकाणा लागला नाही. अखेर ९ ऑगस्ट रोजी सायंकाळी सव्वाचार वाजता त्यांच्या वडिलांनी राजापूर पोलीस ठाण्यात येऊन बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदविली.
पोलिसांनी दिलेल्या वर्णनानुसार, बेपत्ता महिलेचा रंग गोरा असून अंगकाठी सडपातळ, चेहरा उभट आणि उंची सुमारे पाच फूट पाच इंच आहे. त्यांनी लाल रंगाचा अनारकली ड्रेस आणि निळ्या रंगाची ओढणी परिधान केली आहे. त्यांचे केस काळे व लांब असून त्या मोबाईल फोन वापरत नाहीत.
या प्रकरणाचा पुढील तपास राजापूर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक शेख करीत आहेत. बेपत्ता महिलेबाबत कोणतीही माहिती मिळाल्यास नागरिकांनी तातडीने राजापूर पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.



