झारखंड आंदोलनामागे प्रायोजक? सरकारची लाज झाकण्यासाठी आंदोलन चिघळवण्याचा प्रयत्न : भास्कर जाधव

चिपळूण : झारखंडमधील युवकांच्या आंदोलनावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते तथा आमदार भास्कर जाधव यांनी भाजपवर अप्रत्यक्ष निशाणा साधला. युवकांचे आंदोलन चिघळवण्याचा प्रयत्न होत असून, या आंदोलनामागे कुणीतरी प्रायोजक असल्याचा आरोप जाधव यांनी केला. सरकारची लाज झाकण्यासाठी आंदोलन चिघळवले जात असल्याचेही त्यांनी म्हटले.

झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी विद्यार्थ्यांशी सहा वेळा चर्चा केली असून, विद्यार्थ्यांच्या ९० टक्के मागण्या मान्य झाल्याचा दावा जाधव यांनी केला. मात्र, सीजीपी आंदोलन २६ दिवस सुरू असतानाही केंद्र सरकारने आंदोलकांशी चर्चा केली नाही, असा आरोप त्यांनी केला. सोनम वांगचुक यांच्याशी चर्चा न केल्यावरूनही त्यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला. सरकारने स्वतःहून संकट ओढवून घेतले असून, स्वतःचे पाप झाकण्यासाठी झारखंडमधील आंदोलन चिघळवण्याचा प्रयत्न होत आहे का, असा सवालही जाधव यांनी उपस्थित केला.

केंद्रात कोणताही विषय निघाला की पंडित जवाहरलाल नेहरू यांनी काय केले, असा प्रश्न उपस्थित केला जातो. ६२ वर्षे उलटूनही नेहरूंच्या नावाचा आधार घेतला जात असल्याचा टोला भास्कर जाधव यांनी सत्ताधाऱ्यांना लगावला. जंतर-मंतरवरील आंदोलनाला प्रेरणादेखील स्वर्गातून पंडित जवाहरलाल नेहरू यांनी दिली असावी, असा उपरोधिक टोला त्यांनी लगावला. महाराष्ट्रात कोणतीही घटना घडली की उद्धव ठाकरे यांनी काय केले, असा सवाल केला जातो. मग केंद्रातील प्रत्येक विषयासाठी ६२ वर्षांपूर्वीच्या नेहरूंची आठवण का काढली जाते, असा सवाल जाधव यांनी केला.

मुंबई-गोवा महामार्गाच्या रखडलेल्या कामावरूनही भास्कर जाधव यांनी सरकारला लक्ष्य केले. महामार्गाचे काम का रखडले, याचा खुलासा आजपर्यंत झालेला नाही. कोणत्या शेतकऱ्यांनी हरकती घेतल्या, कोणत्या ठेकेदारांनी काम का सोडले, याची माहिती सरकारने जनतेसमोर मांडणे आवश्यक होते. मात्र, अद्याप याबाबत कोणताही ठोस खुलासा झालेला नाही. सरकार केवळ हवेत तीर मारत असून, ठोस उपाययोजना होत नसल्यानेच महामार्गाचे काम रखडले असल्याचे जाधव म्हणाले.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्यावरून सुरू असलेल्या चर्चेवरही जाधव यांनी भाष्य केले. मोदी पंतप्रधानांसारखे वागत नसले, तरी ते देशाचे पंतप्रधान आहेत. त्यामुळे कोणत्याही पक्षाचे लोक त्यांना भेटले म्हणून त्याचा अर्थ विलीनीकरणाची चर्चा असा काढणे चुकीचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदाबाबत झालेल्या तक्रारीवर भाष्य करण्यासही त्यांनी नकार दिला. दुसऱ्या पक्षाच्या अध्यक्षपदाबाबत झालेल्या तक्रारीवर आपण बोलणे योग्य नसून, जे होईल ते पाहत राहायचे, अशी भूमिका त्यांनी मांडली.

महायुतीतील सत्तावाटपावर भाष्य करताना जाधव यांनी भाजपकडून राष्ट्रवादी काँग्रेससह शिंदे शिवसेनेचे खच्चीकरण सुरू असल्याचा आरोप केला. राष्ट्रवादी काँग्रेसला अर्थमंत्रिपद दिले जाईल, असे आपल्याला वाटत नसल्याचेही त्यांनी सांगितले. त्यामुळे महायुतीतील सत्तावाटपाच्या चर्चेला पुन्हा राजकीय रंग चढला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button