
घरफोडीत सोने-चांदीच्या दागिन्यांसह ३ लाख ३७ हजारांचा मुद्देमाल लंपास
चिपळूण : तालुक्यातील गजमल पिंपळी बुद्रुक येथे बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्याने घरफोडी केली. या घरातून सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण ३ लाख ३७ हजार २३२ रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी शिरगाव पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध घरफोडी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६ वाजल्यापासून ७ ऑगस्ट रोजी सायंकाळी ४.३० वाजण्याच्या दरम्यान गजमल पिंपळी बुद्रुक येथील फिर्यादी यांच्या राहत्या घरी ही चोरी झाली. अज्ञात चोरट्याने घराच्या दरवाजाची कडी व कुलूप कोणत्यातरी हत्याराच्या साहाय्याने उचकटून घरात प्रवेश केला. त्यानंतर घरातील सोन्या-चांदीचे दागिने तसेच रोख रक्कम चोरून नेली.
चोरीस गेलेल्या मुद्देमालामध्ये ३ लाख १० हजार ९११ रुपये किमतीचे सोन्याचे दागिने, ६ हजार ३२१ रुपये किमतीचे चांदीचे दागिने आणि २० हजार रुपये रोख, असा एकूण ३ लाख ३७ हजार २३२ रुपयांचा मुद्देमाल असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
याप्रकरणी विलास रघुनाथ गजमल (वय ६१) यांनी शिरगाव पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यांच्या तक्रारीवरून गुन्हा रजिस्टर क्रमांक ५६/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता अधिनियम २०२३ मधील संबंधित कलमांनुसार अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
८ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६.४४ वाजता गुन्हा दाखल करण्यात आला असून, अज्ञात चोरट्याचा शोध घेण्यासाठी शिरगाव पोलिसांकडून तपास सुरू आहे.




