निवडणूक कामासाठी वाहने दिली; दापोलीतील चालक-मालकांचे सहा महिन्यांपासून भाडे थकीत


दापोली : जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकीच्या कामासाठी प्रशासनाला भाडेतत्त्वावर वाहने उपलब्ध करून देणाऱ्या दापोली तालुक्यातील वाहनचालक व मालकांचे गेल्या सहा महिन्यांपासून भाडे थकीत असल्याने त्यांच्यात तीव्र नाराजी पसरली आहे. वारंवार पाठपुरावा करूनही देयके मिळत नसल्याने वाहनमालकांनी दापोली तहसीलदार कार्यालयात निवेदन देत थकीत रक्कम तातडीने अदा करण्याची मागणी केली आहे.

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या कामासाठी दापोली तालुक्यातील अनेक वाहनमालकांनी ५ ते ७ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत आपली वाहने प्रशासनाच्या सेवेत उपलब्ध करून दिली होती. निवडणूक प्रक्रिया पूर्ण होऊन सहा महिन्यांचा कालावधी उलटला असतानाही वाहनांचे भाडे अद्याप मिळालेले नाही.

निवडणूक काळात वाहनांसाठी लागणारे इंधन, देखभाल-दुरुस्ती तसेच इतर खर्च वाहनमालकांनी स्वतःच्या खिशातून केला. काहींना हा खर्च भागविण्यासाठी कर्ज किंवा उसनवारीचा आधार घ्यावा लागला. मात्र, प्रशासनाकडून भाड्याची रक्कम मिळत नसल्याने वाहनांचे हप्ते, कुटुंबाचा उदरनिर्वाह आणि दैनंदिन खर्च भागविताना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे वाहनमालकांनी निवेदनात नमूद केले आहे.

थकीत भाड्यासाठी गेल्या सहा महिन्यांपासून प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा करूनही अद्याप ठोस कार्यवाही झालेली नसल्याने वाहनचालक-मालकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. प्रशासनाने तातडीने थकीत देयके अदा करून आर्थिक संकटात सापडलेल्या वाहनमालकांना दिलासा द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

देयके लवकर अदा न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही वाहनचालक-मालकांनी दिला आहे.

दरम्यान, जिल्हा प्रशासनाकडून अद्याप आवश्यक निधी प्राप्त झालेला नसल्याने संबंधित वाहनमालकांची देयके अदा करता आलेली नसल्याची माहिती तालुका प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button